ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणार्या महत्त्वपूर्ण बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी मालिकेपूर्वी भारतीय क्रिकेट संघासाठी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. टी२० मालिकेतील पहिल्या सामन्यात दुखापतग्रस्त झालेला अष्टपैलू रवींद्र जडेजा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या ऍडलेड कसोटीतून बाहेर पडू शकतो. मिचेल स्टार्कचा चेंडू हेल्मेटवर लागल्याने तो क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरू शकला नव्हता. त्याच्या जागी, फिरकीपटू युझवेंद्र चहलला ‘कन्कशन सब्स्टिट्यूट’ म्हणून मैदानात उतरवण्यात आले होते.
जडेजाला झाली होती दुखापत
कॅनबेरा टी२० मध्ये जडेजाच्या डोक्याला तसेच हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. आता बातमी येत आहे की, या ३२ वर्षीय अष्टपैलू खेळाडूला तीन आठवडे क्रिकेटपासून दूर राहावे लागू शकते. अशा परिस्थितीत ऍडलेडमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या पहिल्या दिवस-रात्र कसोटीत त्याचे खेळणे अवघड झाले आहे. हा सामना १७ ते २१ डिसेंबर दरम्यान खेळला जाईल. यासोबतच, २६ डिसेंबर रोजी मेलबर्न येथे सुरू होणाऱ्या, दुसऱ्या कसोटीतही त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
बीसीसीआय पदाधिकाऱ्याने दिली माहिती
बीसीसीआयच्या एका पदाधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले, “जडेजाला १० दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आयसीसीच्या कन्कशन प्रोटोकॉलनुसार, डोक्याला दुखापत झाल्यावर त्या खेळाडूला कमीतकमी ७ ते १० दिवस विश्रांती घ्यावी लागते.”
या पदाधिकाऱ्याने पुढे म्हटले की, “११ डिसेंबर रोजी ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध होणाऱ्या तीनदिवसीय सराव सामन्यातून जडेजाला वगळले जाणे निश्चित आहे. अशा परिस्थितीत संघ व्यवस्थापनाला जडेजाला सराव सामन्यात न खेळवता सरळ मैदानात उतरवणे कठीण होईल. कोणत्याही खेळाडूला विनासराव मैदानात उतरवणे धोक्याचे असते.”
भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ यांच्यात सुरू असलेल्या सराव सामन्यादरम्यान समालोचकाकडून म्हटले गेले होते की, जडेजा तीन आठवडे क्रिकेट खेळू शकणार नाही. जडेजाने वनडे मालिकेतील अखेरच्या सामन्यात ६६ धावांची अप्रतिम खेळी केली होती. त्यानंतर, टी२० मालिकेतील पहिल्या सामन्यातही दुखापतग्रस्त असताना त्याने ४४ धावांची वेगवान खेळी करत, भारतीय संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिलेली.
महत्त्वाच्या बातम्या-
आयसीसीची नवी कसोटी क्रमवारी झाली जाहीर, ‘या’ भारतीय खेळाडूंचा अव्वल दहामध्ये समावेश
योगायोग आला जुळून! विराटसोबत आता ‘हा’ खेळाडूही बनणार पहिल्यांदा ‘बाबा’, घेणार पालकत्व रजा