पाकिस्तान क्रिकेट संघ सध्या बांग्लादेशच्या दौऱ्यावर आहे. यांच्यात वनडे मालिका सुरू असून त्यातील दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानचा सलमान अली आगा ज्याप्रकारे धावबाद झाला त्याची एकचा चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे. आता त्यामध्ये रावळपिंडीच्या ट्रॅफिक पोलिसांनीही उडी घेतली आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली, जी आता मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
ढाकाच्या शेर ए बांग्ला स्टेडियमवर १३ मार्चला खेळल्या गेलेल्या त्या सामन्यात पाकिस्तान प्रथम फलंदाजी करत होता. सलमान ६४ धावांवर असताना नाट्यमयरित्या बाद झाला. त्यामध्ये ३९व्या षटकात ही घटना घडली. ते षटक बांग्लादेशचा कर्णधार मेहेदी हसन मिराजने टाकले. त्या षटकातील चौथ्या चेंडूवर मोहम्मद रिझवान हलक्या हाताने शॉट खेळला. चेंडू नॉन-स्ट्रायकर एंडकडे गेला आणि सलमानला वाटले चेंडू डेड झाला आहे. त्यामुळे त्याने तो उचलून परत देण्यासाठी पुढे गेला, मात्र हसन वेळीच सावध झाला आणि लगेच चेंडू घेत सलमान क्रिजबाहेर असताना त्याने स्टम्पवर मारला. त्यामुळे सलमान बाद झाला आणि पंचानीही त्याला धावबाद निर्णय दिला.
बाद झाल्यानंतर सलमान नाराज दिसला. त्याची काही बांग्लादेशी खेळाडूंसोबत शाब्दिक चकमकही झाली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यावर रावळपिंडी पोलिसांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी त्यांच्या एक्सच्या अधिकृत अकाऊंटवर फोटो पोस्ट केली आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले, रस्ता असो किंवा खेळाचे मैदान , सुरक्षिततेची सुरूवात वैयक्तिक जबाबदारीपासून होते. स्वत:वर विश्वास ठेवा. सतर्क राहा आणि योग्य निर्णय घ्या, जेणेकरून तुम्ही आणि इतरही सुरक्षित राहतील.
सलमान आगाची अडचण येथेच संपली नाही. त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनेही (आयसीसी) आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल फटकारले. धावबाद झाल्यानंतर त्याने रागाच्या भरात हेल्मेट आणि ग्लोव्ह्ज फेकले होते. त्यामुळे त्याने आयसीसीच्या आचारसंहितेतील २.२ अंतर्गत लेव्हल-१ चे उल्लंघन केले. त्यामुळे त्याला एक डिमेरीट पॉइंटही मिळाला.
यामध्ये पाकिस्तानने बांग्लादेशला २७५ धावसंख्येचे लक्ष्य दिले होते. हा सामना पाकिस्तानने १२८ धावांनी जिंकला. त्यामुळे तीन सामन्यांची ही वनडे मालिका १-१ अशी बरोबरीत आली आहे.






