---Advertisement---

CSK vs RCB: आरसीबीचा चेन्नईविरुद्ध चिन्नास्वामी स्टेडियमवर 43 धावांनी विजय! चेन्नईला अद्याप स्पर्धेतील पहिल्या विजयाची प्रतीक्षा

On: रविवार, एप्रिल 5, 2026 11:39 PM
---Advertisement---

आयपीएल 2026 स्पर्धेच्या (IPL 2026) 11 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चेन्नई सुपर किंग्सचा 43 धावांनी पराभव केला (RCB vs CSK). चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र आरसीबीच्या फलंदाजांनी हा निर्णय चुकीचा ठरवला. त्यांनी प्रथम फलंदाजी करताना 250 धावांचा डोंगर उभा केला. फिल साल्टने 46 धावा करून बंगळुरूला चांगली सुरुवात करून दिली, त्यानंतर देवदत्त पडिक्कलने अर्धशतक झळकावले. रजत पाटीदार (48) आणि टिम डेव्हिड (70) यांनी स्फोटक खेळी खेळली.

लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईच्या आघाडीच्या फलंदाजांनी निराशा केली. संघाने कर्णधारासह 3 विकेट्स अवघ्या 30 धावांत गमावल्या होत्या. हेच त्यांच्या पराभवाचे एक मुख्य कारण ठरले. 251 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्सला सलामीवीरांकडून आक्रमक सुरुवातीची गरज होती, पण संजू सॅमसन आणि ऋतुराज गायकवाड दोघांनीही निराशा केली. संजू (9) पुन्हा एकदा स्वस्तात बाद झाला, त्याला जेकब डफीने बाद केले. डफीनेच ऋतुराजलाही (7) स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये पाठवले. तिसऱ्या क्रमांकावर आलेला आयुष म्हात्रे अवघी 1 धाव काढून भुवनेश्वर कुमारचा शिकार झाला.

सरफराज खानने काही अंशी लढा दिला, त्याने 25 चेंडूत 2 षटकार आणि 8 चौकारांच्या मदतीने 50 धावा केल्या. पण आपले अर्धशतक पूर्ण केल्यानंतर तो बाद झाला, त्याला क्रुणाल पांड्याने बाद केले. तसेच ‘इम्पॅक्ट प्लेयर’ म्हणून आलेल्या कार्तिक शर्मालाही क्रुणालने स्वस्तात बाद केले. कार्तिकने 3 चेंडूत 6 धावा केल्या. शिवम दुबेही मोठी खेळी खेळू शकला नाही, जितेश शर्माच्या शानदार झेलमुळे त्याची खेळी संपुष्टात आली. त्याने 13 चेंडूत 18 धावा केल्या. त्यानंतर प्रशांत वीर आणि जेमी ओव्हरटन यांच्यात अर्धशतकी भागीदारी झाली, तेव्हा चेन्नई पुनरागमन करेल असे वाटले, पण ही भागीदारी तुटल्यामुळे शेवटची आशाही मावळली. दोघांनी 32 चेंडूत 57 धावांची भागीदारी केली. प्रशांतने 29 चेंडूत 43 आणि ओव्हरटनने 16 चेंडूत 37 धावा केल्या.

आरसीबीसाठी फिल साल्ट आणि विराट कोहली यांनी डावाची सुरुवात केली होती. कोहलीला पाचव्या षटकात 7 धावांवर असताना जीवदान मिळाले, त्यानंतर त्याने वेगवान धावा केल्या. मात्र, तो 18 चेंडूत 28 धावा करून बाद झाला. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या देवदत्त पडिक्कलने येताच मोठे फटके खेळायला सुरुवात केली. दुसरी विकेट साल्टच्या रूपाने 11 व्या षटकात पडली, त्याने 30 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने 46 धावा केल्या. तर, देवदत्त पडिक्कलने 29 चेंडूत 50 धावांची शानदार खेळी केली, ज्यामध्ये त्याने 2 षटकार आणि 5 चौकार मारले. तो 15 व्या षटकात बाद झाला, तेव्हा आरसीबीची धावसंख्या 151 होती. त्यानंतर टिम डेव्हिडलाही एक जीवदान मिळाले, जेव्हा तो नो-बॉलवर बोल्ड झाला. त्यानंतर त्याने कर्णधारासोबत मिळून स्फोटक खेळी केली.

शेवटच्या 29 चेंडूंमध्ये टिम डेव्हिड आणि रजत पाटीदार यांनी मिळून तब्बल 99 धावा ठोकल्या. कर्णधार पाटीदारने 19 चेंडूत नाबाद 48 धावा केल्या, या खेळीत त्याने 6 षटकार आणि 1 चौकार लगावला. टिम डेव्हिडने 25 चेंडूत 8 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने नाबाद 70 धावांची तुफानी खेळी केली. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने 250 धावा केल्या, जी त्यांच्या आयपीएल इतिहासातील तिसरी सर्वोच्च धावसंख्या आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---