आयपीएल २०२१ चा हंगाम रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसाठी चांगला गेला आहे. या संघाने सलग दुसऱ्या मोसमात प्लेऑफसाठी पात्रता मिळवली आहे. आरसीबी संघाने त्यांच्या शेवटच्या साखळी सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा रोमहर्षक सामन्यात पराभव केला. यावेळी आरसीबी संघ प्लेऑफमध्ये आणखी चांगली कामगिरी करण्यासाठी सज्ज असेल. बेंगलोरच्या या यशाची अनेक कारणे आहेत, ज्यात उत्तम गोलंदाजी सर्वात महत्वाची बाब आहे.
परंतु, फलंदाजीमध्येही एक खेळाडू सर्वाधिक चमकला, तो विराट कोहली किंवा एबी डिव्हिलियर्स नाही, तर ऑस्ट्रेलियन दिग्गज ग्लेन मॅक्सवेल आहे. ज्याने संघासाठी चमकदार कामगिरी केली आहे. विशेष गोष्ट म्हणजे मॅक्सवेलने एका बाबतीत त्याच्या शेवटच्या ८ हंगामांची बरोबरी या एकाच हंगामात केली आहे.
ग्लेन मॅक्सवेलने या मोसमात आतापर्यंत बेंगलोरसाठी सातत्याने धावा केल्या आहेत. त्याने भारतात पहिल्या टप्प्यात खूप धावा केल्या आणि त्याचा फॉर्म यूएईमध्ये खूप चांगला राहिला. त्याने गेल्या ५ सामन्यांमध्ये सलग ३ अर्धशतकांसह एकूण ४ अर्धशतके केली होती. यूएईच्या आधी भारतात खेळल्या गेलेल्या पहिल्या भागामध्ये मॅक्सवेलने ७ सामन्यांमध्ये २ अर्धशतके केली होती आणि या बाबतीत ऑस्ट्रेलियन फलंदाजाने असे आश्चर्यकारक कामगिरी केले आहे, जी तो आयपीएलच्या गेल्या ८ हंगामात करू शकला नव्हता.
सन २०१२ पासून आयपीएलमध्ये खेळणाऱ्या मॅक्सवेलने २०२० पर्यंत ८ हंगामात एकूण ८२ सामने खेळले आणि १५०० पेक्षा जास्त धावा केल्या. पण २०२१ च्या आधी, या ८ हंगामात मॅक्सवेलने एकूण ६ अर्धशतके केली होती. यापैकी ४ अर्धशतके २०१४ मध्ये लगावली होती हा त्याचा सर्वोत्तम हंगाम होता. त्यावेळी मॅक्सवेलने पंजाबसाठी १६ सामन्यांत ५५२ धावा केल्या होत्या.
पण यावेळी मॅक्सवेलने आरसीबीसाठी जबरदस्त फलंदाजी करताना १३ डावांमध्ये ६ अर्धशतके केली, ज्यात त्याची सर्वोच्च धावसंख्या ७८ धावा आहे. विशेष गोष्ट म्हणजे गेल्या ५ सामन्यांमध्ये त्याने ४ अर्धशतके केली आहेत, तर एका डावात तो ४० धावांवर धावबाद झाला होता.
आरसीबीने यावर्षी लिलावात १४.२५ कोटी रुपये भरून मॅक्सवेलला खरेदी केले होते. गेल्या हंगामात पंजाबचा भाग असलेला मॅक्सवेल फ्लॉप ठरला होता आणि एकही षटकार न मारता केवळ १०८ धावा करू शकला. मॅक्सवेलवर एवढे पैसे खर्च करण्याच्या आरसीबीच्या निर्णयामुळे सर्वांना आश्चर्य वाटले होते, पण ऑस्ट्रेलियन फलंदाजाने यावेळी ते बरोबर सिद्ध केले आहे. त्याने आतापर्यंत १३ डावांमध्ये ४९८ धावा केल्या आहेत. तो आरसीबीकडून सर्वात जास्त धावा करणारा खेळाडू ठरला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
वो हसीना बडी सुंदर! हरली देओलचे गोल्फ कोर्सवरील फोटोंनी चाहत्यांना भुरळ; पाहून तुम्हीही पडाल प्रेमात
होय, तोच माझा प्रेरणास्त्रोत; ‘या’ खेळाडूमुळे भरत दिल्लीविरुद्ध विजयी षटकार मारण्यात झाला यशस्वी