भारतीय क्रिकेट संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. आशिया चषकाआधी प्रमुख खेळाडूंना विश्रांती देत केएल राहुलच्या नेतृत्वातील भारतीय संघ तीन सामन्यांची वनडे मालिका खेळण्यासाठी येथे पोहोचला आहे. मालिका सुरू होण्यासाठी ४८ तासांपेक्षा कमी अवधी शिल्लक असताना भारतीय संघात एक मोठा बदल झाला. अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर हा इंग्लंडमध्ये झालेल्या दुखापतीतून सावरू न शकल्याने मालिकेतून बाहेर झाला आहे. त्याच्या जागी बंगालचा अष्टपैलू शाहबाज अहमद याला संधी देण्यात आली आहे. शाहबाज हा प्रथमच भारतीय ड्रेसिंग रूमचा भाग बनेल.
कोण आहे शाहबाज अहमद?
शाहबाज अहमद हे नाव भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी तितकेसे नवीन नाही. मागील तीन आयपीएल हंगामापासून तो रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचा नियमित सदस्य आहे. डाव्या हाताने फिरकी गोलंदाजी आणि डाव्या हाताने आक्रमक फलंदाजी करत तो फिनिशरची भूमिका देखील पार पाडतो. शाहबाज २०१८ पासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये बंगाल संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. त्याने आतापर्यंत १८ प्रथमश्रेणी, २६ लिस्ट ए व ५६ टी२० सामने खेळले आहेत.
त्याच्या आयपीएल कारकीर्दीचा विचार केल्यास, २०२० आयपीएल रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने त्याला आपल्या संघात निवडले होते. मात्र, त्यावर्षी त्याला केवळ दोन सामने खेळण्याची संधी मिळाली. पुढील वर्षी आरसीबीचा तत्कालीन कर्णधार विराट कोहलीने त्याला अधिकाधिक संधी दिली. त्याने गोलंदाजीत ७ धावा देत ३ बळी टिपण्याची त्या हंगामातील सर्वोत्तम कामगिरी केली होती. २०२२ च्या मेगा ऑक्शनमध्ये आरसीबीने त्याला २.४० कोटींची मोठी बोली लावत पुन्हा आपल्या संघात सामील करून घेतले. या हंगामात तो सर्व १६ सामने खेळला. या हंगामात त्याने २१९ धावा व ४ बळी आपल्या नावे केले. दिनेश कार्तिकसह त्याने संघासाठी अनेक महत्त्वाच्या सामन्यांमध्ये उपयोगी फलंदाजी करत संघाला विजयी केले. खेळाच्या तिन्ही विभागात अप्रतिम कामगिरी करणारा शाहबाज भारतीय संघात स्थान मिळाल्यानंतर कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष असेल.
महत्त्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! दुखापतग्रस्त वॉशिंग्टन सुंदर झिम्बाब्वे दौऱ्यातून बाहेर, रिप्लेसमेंटचीही घोषणा
पंतप्रधानांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात स्म्रीती मंधाना का आली नाही? खरं कारण आलं समोर
आर्थिक संकट टाळण्यासाठी श्रीलंका बोर्डने थेट ‘या’ खेळाडूला ठोठावला दोन अब्ज रुपयांचा दंड!