रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी फलंदाज एबी डिव्हिलियर्स निवृत्त झाला असला तरी तो अजूनही त्याच्या आयपीएल फ्रँचायझीबद्दल सतत बोलत असतो. तो फ्रँचायझीच्या चांगल्या-वाईट गोष्टींवरही नजर ठेवतो.
आयपीएलच्या आगामी हंगामापूर्वी मेगा लिलाव होणार आहे, ज्यामध्ये सर्व फ्रँचायझी चांगला संघ बनवण्याचा प्रयत्न करतील. आता डिव्हिलियर्सनं त्याच्या माजी संघ आरसीबीला चार खेळाडू निश्चितपणे खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. डिव्हिलियर्सनं सुचवलेले खेळाडू कोण आहेत हे आपण या बातमीद्वारे जाणून घेऊया.
एबी डिव्हिलियर्सनं त्याच्या यूट्यूब चॅनेलवर लिलावाबद्दल बोलताना सांगितलं की, आरसीबीचं धोरण उत्कृष्ट आहे. त्याच्या मते, विराटला कायम ठेवणं आणि लिलावासाठी मोठी रक्कम वाचवणं ही संघाची सर्वोत्तम रणनीती होती. डिव्हिलियर्स म्हणाला, “आरसीबीला लिलावात चांगली टीम बनवावी लागेल. जर आम्हाला जागतिक दर्जाचा फिरकीपटू हवा असेल, तर युजवेंद्र चहलला परत आणलं पाहिजे. माझ्या मते, त्याला कधीही जाऊ द्यायला पाहिजे नव्हतं. चहलशिवाय आपण अश्विनवरही लक्ष ठेवायला हवं. तो महान खेळाडू आहे.”
आरसीबीनं आपली गोलंदाजी मजबूत करण्याचं ध्येय ठेवलं पाहिजे, असं डिव्हिलियर्सचं म्हणणे आहे. त्यामुळे त्यानं निवडलेले चार खेळाडू हे सर्व गोलंदाज आहेत. चहल आणि अश्विन या फिरकीपटूंसह डीव्हिलियर्सच्या मते, आरसीबीनं कागिसो रबाडा आणि भुवनेश्वर कुमारच्या रूपात दोन वेगवान गोलंदाजही आणले पाहिजेत.
डिव्हिलियर्स म्हणाला, “संघाला चिन्नास्वामीला समजून घेणारे गोलंदाज हवे आहेत. जे गोलंदाज नियोजनानुसार गोलंदाजी करू शकतात आणि रणनीती योग्यरित्या राबवू शकतात. आरसीबीनं हे चार खेळाडू विकत घेतले पाहिजेत. यानंतर किती पैसे वाचले जातात हे पाहावं लागेल आणि मग ते पैसेही योग्य ठिकाणी वापरावे.”
हेही वाचा –
“लिलावात 25-26 कोटी!!”, हा असेल आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू; आकाश चोप्रांची भविष्यवाणी
“रचिन रवींद्रनं सीएसकेसोबत मिळून भारताविरुद्ध तयारी केली होती”, माजी खेळाडूचा गंभीर आरोप
रिषभ पंतसाठी ऑस्ट्रेलियाचा खास प्लॅन, कर्णधार कमिन्सनं केला मोठा खुलासा