रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. संघाचा स्टार गोलंदाज जोश हेझलवूड प्लेऑफ सामन्यांसाठी भारतात परतत आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या अहवालानुसार, हा ऑस्ट्रेलियन गोलंदाज आयपीएल प्लेऑफ सामन्यांसाठी येण्यास उत्सुक आहे. आरसीबी संघ आधीच प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. 12 सामन्यांमध्ये त्यांचे 17 गुण आहेत. ते पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहेत. आज शुक्रवारी, ते लखनऊच्या एकाना स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबादशी खेळतील.
भारत-पाकिस्तान तणावामुळे आयपीएल काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात येण्यापूर्वी हेझलवूड आरसीबीच्या शेवटच्या सामन्यात खेळू शकला नाही. याचे कारण त्याच्या खांद्यामध्ये समस्या होती. आयपीएल पुढे ढकलल्यानंतर, तो ऑस्ट्रेलियाला परतला आणि ब्रिस्बेनमध्ये ऑस्ट्रेलियन संघाच्या प्रशिक्षणात सहभागी होत आहे. कांगारू संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद (WTC)स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी तयारी करत आहे.
जोश हेझलवूडने आयपीएल 2025 मध्ये 10 सामने खेळले आहेत. ज्यात त्यानो 17.27 च्या सरासरीने 18 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचे आगमन आरसीबीसाठी मोठा दिलासा ठरेल. संघात त्याची उपस्थिती त्यांच्या गोलंदाजीत तीक्ष्णता आणि धार वाढवेल.
आरसीबीला लीग टप्प्यात अजून 2 सामने खेळायचे आहेत. एक सामना आज शुक्रवारी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध आहे. दुसरा सामना 27 मे रोजी लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध खेळला जाणार आहे.






