आयपीएल 2026 (IPL 2026) सुरू होण्यापूर्वी आरसीबी (RCB) संघाला नवा मालक मिळण्याची शक्यता आहे, कारण हा संघ विकला जाण्यासाठी सज्ज झाला आहे. जगातील अनेक मोठ्या कंपन्यांनी आरसीबी खरेदी करण्यात रस दाखवला आहे. जरी आरसीबीने आतापर्यंत (2025 पर्यंत) एकदाच विजेतेपद मिळवले असले, तरी या संघाचे ‘ब्रँड व्हॅल्यू’ मात्र गगनाला भिडले आहे. विराट कोहली (Virat Kohli) या संघात खेळतो आणि यापूर्वीही जगातील अनेक दिग्गज खेळाडू या फ्रँचायझीसाठी खेळले आहेत. आता आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी (Lalit Modi) यांनी आरसीबीच्या किमतीबाबत मोठे विधान केले आहे.
‘आयएएनएस’ या वृत्तसंस्थेनुसार, ललित मोदींनी याची पुष्टी केली आहे की, आरसीबीची किंमत आता सुमारे 1.5 बिलियन अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे, जी भारतीय रुपयांत अंदाजे 15.85 हजार कोटी रुपये इतकी होते. रिपोर्टनुसार, मँचेस्टर युनायटेडचे सह-मालक एवराम ग्लेजर यांनीही हा संघ विकत घेण्यात रस दाखवला आहे.
ललित मोदी पुढे म्हणाले की, हे सध्याचे मूल्य सध्याच्या 74 सामन्यांच्या आधारावर आहे.
भविष्यात जेव्हा सामन्यांची संख्या वाढून 94 होईल, तेव्हा आयपीएलची कमाई आणि संघांच्या किमतीत मोठी वाढ होईल. बीसीसीआयसाठी हा बदल गरजेचा आहे कारण भविष्यात आयसीसीकडून मिळणाऱ्या फंडमध्ये 50-60% घट होऊ शकते आणि दोन देशांमधील मालिकेच्या मीडिया राइट्समधून मिळणारी कमाई देखील निम्मी राहू शकते. अशा परिस्थितीत आयपीएल सामन्यांचा विस्तारच बोर्डाची आर्थिक स्थिती मजबूत ठेवेल.
विशेष म्हणजे, आयपीएल 2025 मध्ये आरसीबीने विजेतेपदावर आपले नाव कोरले होते. रजत पाटीदारच्या (Rajat Patidar) नेतृत्वाखाली संघाने फायनलमध्ये पंजाब किंग्सचा पराभव करून पहिले जेतेपद पटकावले होते.






