आयपीएल 2026 च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात मंगळवारी (26 मे) धर्मशाला येथे गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात जोरदार लढत रंगणार आहे. सायंकाळी साडेसात वाजता सुरू होणाऱ्या या सामन्यासाठी दोन्ही संघ धर्मशालामध्ये दाखल झाले असून सरावालाही सुरुवात केली आहे.
दरम्यान, आरसीबीचा स्टार सलामीवीर फिल सॉल्ट खेळणार की नाही, याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता होती. यावर संघाचा कर्णधार रजत पाटीदार याने मोठे अपडेट दिले आहे. सामन्याच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत बोलताना पाटीदार म्हणाला की, “सॉल्ट सध्या फिट आहे. तो डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे आणि सरावातही सहभागी होत आहे. मात्र अंतिम निर्णय मेडिकल टीमच्या सल्ल्यानंतर घेतला जाईल.”
फिल सॉल्टला 18 एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात बोटाला दुखापत झाली होती. त्यानंतर तो उपचारासाठी इंग्लंडला परतला होता. आता तो पुन्हा संघासोबत सराव करत असल्याने आरसीबीसाठी ही दिलासादायक बातमी मानली जात आहे.
सॉल्टच्या अनुपस्थितीत आरसीबीने जेकब बेथल याला सलामीवीर म्हणून संधी दिली होती. मात्र त्याला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्यानंतर मागील सामन्यात व्यंकटेश अय्यर याला ओपनिंगला उतरवण्यात आले. त्याने सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध दमदार खेळी केली. त्यामुळे आता आरसीबीसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. संघ व्यवस्थापन अनुभवी फिल सॉल्टवर विश्वास ठेवणार की व्यंकटेश अय्यरसोबतचे संयोजन कायम ठेवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गुणतालिकेचा विचार केला तर आरसीबीने 14 पैकी 9 सामने जिंकत 18 गुणांसह प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. गुजरात टायटन्सनेही 18 गुण मिळवले, मात्र नेट रनरेट कमी असल्याने त्यांनी दुसऱ्या स्थानावर हंगाम संपवला. त्यामुळे या दोन मजबूत संघांमध्ये रंगतदार सामना होण्याची शक्यता आहे.






