आगामी आयर्लंड दौऱ्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या १७ सदस्यीय भारतीय संघाचे नेतृत्त्व अष्टपैलू हार्दिक पंड्या याच्याकडे सोपवण्यात आले आहे. पंड्याबरोबर अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यात उभय संघात २ सामन्यांची टी२० मालिका खेळवली जाणार आहे. यादरम्यान वरिष्ठ खेळाडूंचा संघ इंग्लंड दौऱ्यावर असल्याने नवख्या संघाला आयर्लंड दौऱ्यावर पाठवण्यात येणार आहे.
अशात भारताच्या संघ व्यवस्थापनाने २८ वर्षीय हार्दिकवर कर्णधारपदाची मोठी सोपवण्याची ही पहिलीच वेळ आहे. मात्र संघ व्यवस्थापनाने त्याच्यावर इतका विश्वास दाखवण्यामागची कारणे काय असतील? याबद्दल या लेखातून जाणून घेऊ…
हार्दिक पंड्याला भारतीय संघाचा कर्णधार बनवण्यामागची ५ कारणे:
आयपीएलमधील प्रभावी नेतृत्त्व-
हार्दिकला भारतीय संघाच्या कर्णधारपदी निवडण्यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे, आयपीएल २०२२च्या हंगामातील प्रभावी नेतृत्त्व कामगिरी होय. नवख्या गुजरात टायटन्स संघाने हार्दिकवर विश्वास दाखवत त्याच्या हाती संघाची सूत्रे दिली होती. हार्दिकने संघाचा विश्वास सार्थकी लावत साखळी फेरीतील १४ पैकी १० सामने जिंकले होते आणि सर्वप्रथम प्लेऑफमध्ये जागा बनवली होती. प्लेऑफमध्येही दमदार खेळ दाखवत गुजरात संघाने आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरले होते. यादरम्यान पहिल्यांदाच कर्णधारपदाची जबाबदारी खांद्यावर घेतलेल्या हार्दिकने वेळोवेळी योग्य निर्णय घेत संघाच्या विजयात योगदान दिले होते.
प्रभावी नेतृत्त्वाबरोबरच फलंदाजीतील फॉर्म-
आयपीएलमध्ये गुजरात संघाचे नेतृत्त्व करताना हार्दिकने कॅप्टन लिडिंग फ्रॉम फ्रँटचा प्रत्यय दिला होता. कर्णधाराच्या रूपात केवळ संघबांधणी, क्षेत्ररक्षण सजवणे, गोलंदाजीबद्दल अचूक निर्णय घेणे अशी कामे करण्याबरोबरच संघ कठीण परिस्थितीत असताना विस्फोटक खेळी खेळत संघाला विजय मिळवून देण्याचे कामही केले होते. त्याने आयपीएलच्या पंधराव्या हंगामात १५ सामने खेळताना ४४.२७ च्या सरासरीने ४८७ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून ४ अर्धशतकेही निघाली. त्याचा हाच फलंदाजी फॉर्म आयर्लंडविरुद्धही उपयोगी पडू शकतो.
वरिष्ठ खेळाडू अनुपलब्ध-
२६ जून ते २८ जून, या कालावधीत भारतीय संघ आयर्लंडविरुद्ध २ सामन्यांची टी२० मालिका खेळणार आहे. याचवेळी भारताचा मुख्य संघ इंग्लंडमध्ये लिसेस्टरशायर संघाविरुद्ध सराव कसोटी सामना खेळत असेल. २४ ते २७ जूनदरम्यान हा खेळवला जाईल. त्यानंतर लगेचच १ जूनपासून इंग्लंड आणि भारतीय संघात पुनर्निधारीत पाचवा कसोटी सामना खेळवला जाईल. हा सामना आयसीसीच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या हंगामाअंतर्गत येतो. त्यामुळे या सामन्यासाठी कर्णधार रोहित शर्मासह विराट कोहली, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, केएल राहुल असे संघातील वरिष्ठ आणि प्रमुख सदस्य उपलब्ध असतील.
याच कारणास्तव आयर्लंडविरुद्ध बऱ्याच अननुभवी खेळाडूंना संधी दिली गेली आहे. संपूर्ण संघ पाहता त्यातील हार्दिक हाच नेतृत्त्वपदासाठी प्रबळ दावेदार आहे.
संघातील इतरांपेक्षा जास्त अनुभव-
आयर्लंडविरुद्ध अधिकतर युवा खेळाडूंना संधी दिली गेली आहे. संघात हार्दिकबरोबर भुवनेश्वर कुमार आणि दिनेश कार्तिक यांना वगळता इतरांकडे आंतरराष्ट्रीय पातळीवर जास्त सामने खेळण्याचा अनुभव नाही. त्यामुळे अनुभवाच्या जोरावर हार्दिकला कर्णधारपदासाठी योग्य मानले गेले असावे.
भविष्याचा विचार-
सध्या रोहित शर्मा भारतीय संघाचा नियमित कर्णधार आहे. परंतु त्याचे वय आता ३५ वर्षे असल्याचे तो पुढील जास्तीत जास्त २-३ वर्षे भारतीय संघाच्या नेतृत्त्वाचा भार सांभाळू शकतो. अशात त्याच्यानंतर भारतीय संघ व्यवस्थापनाला युवा आणि अनुभवी खेळाडूचा शोध असेल, जो पुढील ६-८ वर्षे भारतीय संघाची कमान सांभाळेल. अशात २८ वर्षीय हार्दिकवर भारताचे संघ व्यवस्थापन डोळे झाकून विश्वास ठेऊ शकतो. रोहितच्या नेतृत्त्वाखाली त्याला तयार करून घेण्याचा भारतीय संघाचा मानस असावा.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘कधी दिवस चांगले…’, भारतासाठी पहिले अर्धशतक ठोकल्यानंतर ऋतुराजने सांगितले खेळीमागील रहस्य
फॉर्मात नसलेल्या रोहित-विराटचं पुढे काय होणार, टी२० विश्वचषकातून डच्चू मिळेल का?
इंग्लंड दौऱ्यासाठी ‘या’ महत्त्वाच्या खेळाडूच्या उपस्थितीवरच प्रश्नचिन्ह, दुखापत ठरलीय कारण