चेन्नईच्या मथिशा पाथिरानानं मुंबई इंडियन्सविरुद्ध वानखेडे स्टेडियमवर शानदार गोलंदाजी केली. 206 धावांचा बचाव करताना त्यानं 4 षटकांत 28 देत 4 बळी घेतले. या चमकदार कामगिरीनंतर सीएसकेच्या या युवा वेगवान गोलंदाजाचं सर्वत्र कौतुक होतं आहे.
पाथिराना हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे चेन्नईसाठी शेवटचे दोन सामने खेळू शकला नव्हता. परंतु मुंबईविरुद्ध लक्ष्याचा बचाव करताना जेव्हा विकेट्सची सर्वाधिक आवश्यकता होती, तेव्हा तो आपल्या संघासाठी धावून आला. त्यानं ईशान किशन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा आणि रोमारिओ शेफर्डची विकेट घेतली. त्याच्या धारदार गोलंदाजीच्या जोरावर चेन्नईनं 20 धावांनी विजय मिळवला. या शानदार कामगिरीसाठी पाथिरानाला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कारानं गौरवण्यात आलं.
सामना संपल्यानंतर पाथिराना म्हणाला, ‘जेव्हा आम्ही पॉवरप्लेमध्ये गोलंदाजी करत होतो, तेव्हा मी खूप घाबरलो होतो. मला शांत राहून गोलंदाजी करण्यास सांगण्यात आलं, ज्यामुळे मला आत्मविश्वास मिळाला. मी निकालाचा फारसा विचार करत नाही. मला फक्त माझा खेळ सुधारण्याची काळजी वाटते.”
पाथिरानानं मुंबईच्या 70 धावा झाल्या असताना ईशान किशन (23) च्या रूपानं पहिला धक्का दिला. यानंतर त्याच षटकात त्यानं सूर्यकुमार यादवला (0) मुस्तफिजूर रहमानकरवी झेलबाद केलं. त्यानंतर त्यानं तिलक वर्मा (31) आणि रोमॅरियो शेफर्ड (1) यांना बाद करून मुंबईला बॅकफूटवर आणलं. पाथिरानानं 4 षटकात केवळ 28 धावा देत 4 बळी घेतले.
सामन्यानंतर बोलताना तो म्हणाला की, “कधीकधी मला फलंदाजांनुसार माझं नियोजन बदलावं लागतं. दोन आठवड्यांपूर्वी मी थोडासा संघर्ष करत होतो, परंतु सपोर्ट स्टाफनं मला पाठिंबा दिला. हेच माझ्या फॉर्मचं मुख्य कारण आहे.”
मथिशा पाथिरानाची गोलंदाजी अॅक्शन श्रीलंकेचा महान गोलंदाज लसिथ मलिंगाशी मिळतीजुळती आहे. मात्र तो चर्चेत असतो तो विकेट घेतल्यानंतर त्याच्या अनोख्या सेलिब्रेशनसाठी. पाथिराना आक्रमकतेनंं आपली विकेट साजरी करतो. तो महान फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोचा फॅन आहे. विकेट घेतल्यानंतर पाथिराना रोनाल्डोचं ‘नॅप सेलिब्रेशन’ करतो. विकेट प्राप्त करताच पाथिराना आपले दोन्ही हात छातीवर आणतो आणि त्यांना एकत्र जोडतो. यानंतर तो वर आकाशाकडे पाहतो आणि डोळे बंद करतो. ही त्याची अनोखी सेलिब्रेशन स्टाईल सध्या चर्चेचा विषय बनली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“हार्दिक पांड्याचं नेतृत्व अन् गोलंदाजी दोन्ही अगदी सामान्य”, सुनील गावसकरांची जोरदार टीका