---Advertisement---

“हार्दिक पांड्याचं नेतृत्व अन् गोलंदाजी दोन्ही अगदी सामान्य”, सुनील गावसकरांची जोरदार टीका

---Advertisement---

मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनल्यापासून हार्दिक पांड्यासाठी काहीही ठीक चाललेलं नाही. रविवारी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबईला कट्टर प्रतिस्पर्धी चेन्नई सुपर किंग्जकडून 20 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.

हार्दिक पांड्यासाठी हा सामना फारच वाईट राहिला. त्यानं चेन्नईच्या डावातील शेवटचं षटक टाकण्याची जबाबदारी घेतली होती. मात्र या षटकात त्याला 26 धावा बसल्या. एमएस धोनीनं हार्दिक पांड्याला लागोपाठ 3 चेंडूत 3 षटकार मारून संघाचा स्कोर 200च्या पार नेला. यानंतर आता दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर आणि केविन पीटरसन यांनी हार्दिक पांड्यावर जोरदार टीका केली आहे.

सुनील गावसकर हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर टीका करत म्हणाले, “एक षटकार ठीक आहे, मात्र पुढचा चेंडूही तुम्ही लेन्थ बॉल टाकता, हे माहीत असतानाही की बॅट्समन अशा चेंडूची वाट पाहतोय. यानंतर तिसरा चेंडू तुम्ही फुल टॉस टाकता. ही अतिशय सामान्य गोलंदाजी आणि हा अतिशय सामान्य कर्णधार आहे. मला वाटतं की, मुंबईनं चेन्नईला 185-190 धावांपर्यंत रोखायला हवं होतं.”

सुनील गावसकर आणि केविन पीटरसन स्टार स्पोर्ट्सवर सामन्याचं विश्लेषण करत होते. त्यानंतर दोघांनीही हार्दिक पांड्यावर टीका केली. केविन पीटरसननं म्हटलं की, हार्दिक पांड्यावर प्रेक्षकांच्या हूटिंगचा प्रभाव पडत आहे.

वेस्ट इंडिजचा दिग्गज क्रिकेटपटू ब्रायन लारा कॉमेंट्री दरम्यान म्हणाला, “मुंबईकडे गोलंदाजी करू शकणारे फिरकीपटू आहेत. तुम्हाला खेळाचा वेग बदलण्याची गरज आहे, तेव्हा तुम्ही फिरकीपटू लावू शकले असते. मला वाटतं, हार्दिकवर खेळाबाहेरच्या गोष्टींचा परिणाम होत आहे. नाणेफेक करताना तो खूप हसत होता. तो आनंदी असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न करतोय. मात्र तो आनंदी नाही.”

केविन पीटरसन म्हणाला, “प्रेक्षकांच्या वागण्याचा तुमच्यावर परिणाम होतो असं मी म्हणेन. हार्दिक पांड्यासोबत जे काही घडत आहे, त्याला ज्या प्रकारे बदनाम केलं जात आहे ते त्याला दुखावणारं आहे. तो भारतीय खेळाडू आहे. त्याला अशा प्रकारची वागणूक द्यायला नको. यामुळे त्याच्या खेळावर आणि स्वतःवरही प्रभाव पडत आहे. याबाबत काहीतरी करायला हवं.”

चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध हार्दिक पांड्याची कामगिरी निराशाजनक राहिली. आधी गोलंदाजीत त्यानं 4 षटकात 43 धावा दिल्या आणि दोन बळी घेतले. यानंतर त्याला फलंदाजीत विशेष काही करता आलं नाही. तो केवळ 2 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. मुंबई इंडियन्सला चेन्नईकडून 20 धावांनी पराभव पत्करावा लागला. ते गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

महाराष्ट्राच्या वाघानं इतिहास घडवला! केएल राहुलचा मोठा विक्रम मोडला; अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय!

“तो पूर्णपणे तंदुरुस्त वाटत नाही”, हार्दिक पांड्याच्या फिटनेसवर गिलख्रिस्टनं उपस्थित केले प्रश्न

टी20 क्रिकेटमध्ये 500 षटकार मारणारा पहिला भारतीय! ‘हिटमॅन’ सारखा दुसरा कोणीच नाही!

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---