इंडियन प्रीमियर लीग २०२१ आता शेवटाकडे जात आहे. प्लेऑफचे सामने सुरू झाले आहेत. पहिल्या क्वालिफायरमध्ये महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जने दिल्ली कॅपिटल्सचा चार गडी राखून पराभव केला. या विजयासह धोनीचा संघ विक्रमी नवव्यांदा आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. इतक्या वेळा अन्य कोणताही संघ अंतिम फेरीत पोहोचलेला नाही. चेन्नईने २०१०, २०११ आणि २०१८ मध्ये विजेतेपद पटकावले आहे. याशिवाय त्यांनी २००८, २०१२, २०१३, २०१५ आणि २०१९ मध्ये ते उपविजेते राहिले आहेत.
तीन वेळा आयपीएलचे जेतेपद पटकावलेला सीएसकेचा संघ २०२० मध्ये पूर्णपणे फ्लॉप ठरला होता. आयपीएलच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडले होते, जेव्हा एमएस धोनी कर्णधार असलेल्या चेन्नई संघ प्लेऑफमध्ये पोहोचला नव्हता. पण यावर्षी चेन्नई सुपर किंग्जने अफलातून पुनरागमन केले आणि दिमाखात अंतिम सामना गाठला. चेन्नईच्या यशाच्या सहा मोठ्या कारणांबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
१. मुख्य संघात कमी बदल:
मागील सत्राच्या तुलनेत आयपीएलच्या १४ व्या हंगामात चेन्नई संघात काही विशेष बदल केले गेले नाही. सीएसकेने यावर्षी केवळ दोन-तीन महत्त्वाचे खेळाडू खरेदी केले. चेन्नईने मोईन अलीला ७ कोटी रुपयांना आणि कृष्णाप्पा गौतमला ९.२५ कोटी रुपयांना लिलावात खरेदी केले होते. याशिवाय रॉबिन उथप्पालाही त्यांनी विंडो ट्रेडिंगद्वारे संघात सामील केले.
पहिल्या टप्प्यात मोईनने त्याच्या झंझावाती फलंदाजीने आणि गोलंदाजीने संघाला विजयाकडे नेले. त्याचबरोबर दुसऱ्या टप्प्यात रवींद्र जडेजा, फाफ डु प्लेसिस आणि ऋतुराज गायकवाड यांनी उत्कृष्ट फलंदाजी करत संघाला बळकटी दिली. याशिवाय, जॉस हेजलवूड, शार्दुल ठाकूर आणि दीपक चाहर यांनी गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली आहे. धोनीने गेल्या काही वर्षांत आपला मुख्य संघ चांगल्या पद्धतीने सांभाळून ठेवला.
२. आपल्या खेळाडूंना पाठिंबा:
धोनीची गणना त्या कर्णधारांमध्ये केली जाते, जे त्यांच्या खेळाडूंना वाईट काळातही खूप आधार देतात. गेल्या हंगामात जेव्हा चेन्नईची फलंदाजी फ्लॉप ठरली होती, तेव्हाही त्याने आपल्या फलंदाजांना साथ दिली. गेल्या हंगामात ऋतुराज त्याच्या पहिल्या काही सामन्यांमध्ये अत्यंत खराब खेळला होता. यानंतर धोनीवरही बरीच टीका झाली होती. धोनीने त्यावेळी ऋतुराजला पाठिंबा दिला होता आणि आता त्याचा निकाल सर्वांसमोर आहे.
३. आत्मविश्वास:
फॉर्म आणि तंत्र या दोन गोष्टी आहेत, ज्या वेळोवेळी बदलतात, परंतु आत्मविश्वास ही अशी गोष्ट आहे, जी खेळाडूंना चांगले कामगिरी करण्यास कायम प्रेरित करत असते. गेल्या मोसमात खराब कामगिरी असूनही संघ व्यवस्थापनाने आपल्या खेळाडूंचे मनोबल खचू दिले नाही. कर्णधार धोनी आणि संघावर त्यांचा पूर्ण विश्वास होता. हा विश्वास यावर्षी संघाच्या यशाचे कारण ठरला आहे. जेव्हा एखादा खेळाडू खेळला नाही, तेव्हा त्याच्या जागी इतर काही खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आणि संघाला विजयाकडे नेले.
४. वरच्या फळीची दमदार कामगिरी:
यंदा सीएसकेची वरच्या फळीतील फलंदाज उत्तम फॉर्ममध्ये दिसत होते. आतापर्यंत संघाचे दोन खेळाडू सर्वाधिक धावा करणाऱ्या ५ खेळाडूंमध्ये आहेत. या संघाकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या पहिल्या तीनमध्ये ऋतुराज १५ सामन्यांत ६०३ धावांसह प्रथम स्थानी, डुप्लेसिस १५ सामन्यांत ५४७ धावांसह दुसऱ्या स्थानी आणि १४ सामन्यात ३२० धावांसह मोईन अली तिसऱ्या स्थानावर आहे.
या तिघांनीही आपल्या कामगिरीने अनेक सामन्यांमध्ये संघाला विजयाकडे नेले. याशिवाय चौथ्या क्रमांकावर येणाऱ्या रायुडूने १५ सामन्यांमध्ये २५७ धावा केल्या आहेत. जडेजाने गरज असताना खालच्या क्रमांकावर येत अनेक वादळी खेळी खेळल्या आहेत.
५. उत्कृष्ट गोलंदाजी:
एकीकडे संघाच्या फलंदाजांनी चमकदार कामगिरी केली आहे, तर दुसरीकडे गोलंदाजांनीही त्यांची भूमिका चोख बजावली आहे. शार्दुल ठाकूर आणि दीपक चहर या जोडीने आघाडीच्या संघांना खूप त्रास दिला आहे. दीपकने पॉवरप्लेमध्ये विकेट्स घेतल्या आहेत, तर शार्दुलने मधल्या षटकांत बऱ्याच विकेट्स घेतल्या आहेत.
जॉस हेजलवूड आणि रवींद्र जडेजा यांनीही विरोधी संघाला त्यांच्या उत्तम गोलंदाजीने धावा काढण्यापासून रोखले आहे आणि गरज पडल्यावर विकेटही घेतल्या आहेत. डेथ ओव्हर्समधील ड्वेन ब्राव्होची गोलंदाजी कोण विसरू शकेल? ब्राव्होने अनेक सामन्यांमध्ये आपल्या अचूक यॉर्करने सीएसकेला विजयाकडे नेले.
६. स्वतः कर्णधार धोनी:
धोनी वयाच्या ४० व्या वर्षी चांगली फलंदाजी करत नसला तरी तो अजूनही एक महान कर्णधार आहे. यंदाच्या हंगामातची त्याचे कुशल नेतृत्व दिसून आले. त्याने अनेकदा संघाला फायदेशीर ठरतील असे, योग्य निर्णय घेतले.
महत्त्वाच्या बातम्या –
मैं तेरा जबरा फॅन हो गया; धोनीच्या खेळीनंतर शॉची मन जिंकणारी प्रतिक्रिया
पृथ्वी शॉने मारला खणखणीत षटकार, स्टँडमध्ये चाहत्याने पकडला अफलातून झेल, पाहा व्हिडिओ






