---Advertisement---

चौदा वर्षांनंतर टीम इंडियाकडे टी२० विश्वचषक जिंकण्याची संधी, पण ‘ही’ ३ कारणे फेरू शकतात पाणी

On: मंगळवार, सप्टेंबर 14, 2021 8:42 PM
Bhuvneshwar Kumar, Washington Sundar Virat Kohli (Team India)
---Advertisement---

येत्या १७ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या टी-२० विश्वचषकाची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे. प्रत्येक देशाने आपआपले संघ देखील जाहीर केले आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही (बीसीसीआय) ८ सप्टेंबर रोजी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेसाठी १५ सदस्यीय संघाची घोषणा केली. भारतीय संघ २४ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने स्पर्धेची सुरुवात करण्यासाठी मैदानात उतरेल.

यंदाच्या भारतीय टी२० विश्वचषक संघात एकापेक्षा एक भारी खेळाडू आहेत. विराट कोहली, रोहित शर्मा, भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराहसारखे दिग्गज या भारतीय संघात आहेत. पण कुठेतरी काही समस्या आहेत, ज्या भारतीय संघाच्या विजयात अडचणी निर्माण करू शकतात. यामुळे भारतीय संघाच्या तब्बल १४ वर्षांनंतर टी२० विश्वचषक जिंकण्याच्या स्वप्नावर पाणी फेरले जाऊ शकते. त्याच ३ मोठ्या कारणांवर एक नजर टाकूया.

१. युझवेंद्र चहलला संघात सामील न करणे
चाहते आणि सर्व क्रिकेट पंडितांनी चहलला संघातून वगळल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. बऱ्याच काळापासून चहल मर्यादित षटकांच्या प्रकारात भारतीय फिरकी आक्रमणाचे नेतृत्व करत आहे आणि अशा परिस्थितीत कोणीही त्याला संघातून वगळण्याचा निर्णय पचवू शकत नाही. चहल काही वर्षांपासून आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करत होता, ज्यामुळे त्याला भारतीय संघात समाविष्ट करण्यात आले होते. त्यानंतर तो भारतासाठी एक महत्त्वाचा गोलंदाज राहिला आहे.

युझवेंद्र चहल भारतासाठी सर्वाधिक टी२० विकेट घेणारा गोलंदाज आहे. त्याने आतापर्यंत भारतीय संघासाठी टी-२०त ६३ विकेट्स घेतल्या आहेत. तो आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून खेळतांना आपल्या कर्णधारासाठी सर्वोत्तम गोलंदाज राहिला आहे. चहल सातत्यपूर्ण कामगिरी करणारा गोलंदाज आहे. अशा स्थितीत विश्वचषक संघात त्याची अनुपस्थिती भारताला हानी पोहोचवू शकते.

२. संघात डावखुऱ्या फलंदाजांचा समावेश कमी करणे
भारतीय संघाच्या फलंदाजी फळीत उत्कृष्ट फलंदाज आहेत आणि सर्व मॅच विनर आहेत. संघात रोहित शर्मा आणि विराट कोहली व्यतिरिक्त केएल राहुल, इशान किशन, रिषभ पंत, हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादवसारखे स्फोटक फलंदाज उपस्थित आहेत. पण एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे संघात डावखुऱ्या फलंदाजांचा समावेश खूप कमी आहे.

यष्टीरक्षक रिषभ पंत आणि इशान किशन हे संघातील डावखुरे खेळाडू आहेत. याशिवाय रवींद्र जडेजा हा डाव्या हाताचा खेळाडू आहे. उजव्या आणि डाव्या हाताच्या जोडीने फलंदाजी करताना खूप फायदा होतो. पण कमी डावखुरे फलंदाज असल्याने तसे करणे कठीण होणार आहे.

३. हार्दिक पांड्याचा फॉर्म चिंतेचा विषय
हार्दिक पांड्या अलीकडे सर्वोत्तम फॉर्ममध्ये नाही आणि याचा आगामी टी२० विश्वचषक २०२१ मध्ये भारतीय संघाच्या समतोलावर मोठा परिणाम होऊ शकतो. तो अद्याप त्याच्या पूर्ण ताकदीनीशी गोलंदाजी करत नाही आहे आणि भारतीय संघासाठी ही एक मोठी चिंतेची बाब असेल. कारण त्यांच्याकडे हार्दिक पांड्यासारखे अजून खेळाडू नाहीत.

पांड्या श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत खेळलेल्या दोन डावांमध्ये फक्त ९ धावा करू शकला होता. संघातील अनुभवी म्हणून त्याच्याकडून खूप अपेक्षा होत्या. शार्दुल ठाकूर संघात त्याचा पर्याय ठरू शकतो, परंतु त्याला राखीव खेळाडू म्हणून निवडण्यात आले आहे. ज्यामुळे त्याला विश्वचषकात खेळवणे कठीण होणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---