ऍशेस मालिका 2023मध्ये लीड्स येथील तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघाचा दिग्गज वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याने एक खास विक्रम नावावर केला आहे. ब्रॉड याने कसोटी क्रिकेटमध्ये एकाच फलंदाजाला सर्वाधिक वेळा बाद करण्याचा विक्रम नोंदवला आहे. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज सलामीवीर फलंदाज डेविड वॉर्नर त्याची शिकार ठरला आहे. विशेष म्हणजे, असा विक्रम करणारा तो इंग्लंडचा दुसराच गोलंदाज ठरला आहे. चला तर त्याच्या विक्रमाविषयी सविस्तर जाणून घेऊयात…
कसोटीत ब्रॉडविरुद्ध वॉर्नर 17 वेळा बाद
हेडिंग्ले कसोटी सामन्यात इंग्लंडचा पहिला डाव 237 धावांवर संपुष्टात आला. यानंतर ऑस्ट्रेलियाला 26 धावांची आघाडी मिळाली. यावेळी ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या डावाची सुरुवात करण्यासाठी उस्मान ख्वाजा आणि डेविड वॉर्नर मैदानावर आले होते. यावेळी वॉर्नर फार काळ टिकू शकला नाही. तो फक्त 5 चेंडू खेळून तंबूत परतला. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावातील तिसरे षटक टाकण्यासाठी स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) आला होता. ब्रॉडच्या दुसऱ्या चेंडूवर वॉर्नर स्ट्राईकवर होता. यावेळी ब्रॉडने वॉर्नरला झॅक क्राऊले याच्या हातून झेलबाद केले. यावेळी वॉर्नरला 1 धावेवर स्वस्तात तंबूचा रस्ता पकडावा लागला. यामुळे वॉर्नरच्या नावावर सर्वाधिक वेळा ब्रॉडविरुद्ध बाद होण्याची नामुष्की ओढावली, तर ब्रॉडने खास विक्रम रचला.
Stuart Broad gets David Warner for the 17th time in Tests ????#WTC25 | #ENGvAUS ????: https://t.co/CIqx6cW10r pic.twitter.com/pb7J34XE0A
— ICC (@ICC) July 7, 2023
कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत ब्रॉडने डेविड वॉर्नरला 17 वेळा बाद केले आहे. त्यामुळे ब्रॉड कसोटीत अशी कामगिरी करणारा इंग्लंडचा दुसराच गोलंदाज ठरला. इंग्लंडकडून कसोटीत सर्वाधिक वेळा एका फलंदाजाला बाद करण्याचा विक्रम दिग्गज गोलंदाज ऍलेक बेडसर (Alec Bedser) यांच्या नावावर आहे. त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या आर्थर मॉरिस यांना कसोटीत सर्वाधिक 18 वेळा बाद केले होते. आता हा विक्रम मोडण्याची संधी ब्रॉडकडे आहे. कारण, इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात आणखी 2 ऍशेस कसोटी सामने खेळले जाणार आहेत.
याव्यतिरिक्त यादीत तिसऱ्या स्थानी इंग्लंडचे माजी दिग्गज गोलंदाज सिडनी बार्न्स यांच्या नावावर आहे. त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टर ट्रम्पर यांना 13 वेळा कसोटीत तंबूचा रस्ता दाखवला होता.
विशेष म्हणजे, पहिल्या डावातही वॉर्नरला ब्रॉडनेच बाद केले होते. ब्रॉड टाकत असलेल्या डावाच्या पहिल्याच षटकातील पाचव्या चेंडूवर वॉर्नर झॅक क्राऊलेच्याच हातून झेलबाद झाला होता. त्यावेळी वॉर्नर 5 चेंडूत 1 चौकार मारून 4 धावांवर बाद झाला होता. (Record alert Stuart Broad took the wicket of David Warner 17 times)
कसोटीत एका फलंदाजाला सर्वाधिक वेळा बाद करणारे इंग्लंडचे गोलंदाज
18 वेळा- ऍलेक बेडसर, विरुद्ध- आर्थर मॉरिस (ऑस्ट्रेलिया)
17 वेळा- स्टुअर्ट ब्रॉड, विरुद्ध- डेविड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया)*
13 वेळा- सिडनी बार्न्स, विरुद्ध- व्हिक्टर ट्रम्पर (ऑस्ट्रेलिया)
महत्वाच्या बातम्या-
कमिन्सच्या भेदक माऱ्यापुढे पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला इंग्लंडचा डाव, ऑस्ट्रेलियाकडे 26 धावांची आघाडी
विकेट्सचं पंचक! हेडिंग्ले कसोटीत पॅट कमिन्सने उडवला इंग्लिश फलंदाजांचा धुव्वा