पुणे – महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या महिला प्रिमियर लीगसाठी चार संघांची मालकी घेण्यासाठी शनिवारी झालेल्या लिलाव प्रक्रियेत विक्रमी रुपयांची बोली लागली. चार संघांसाठी संघ मालकांनी तब्बल १५.९ कोटी रुपये खर्च केले.
सर्व राज्य संघटनांमध्ये महिला संघाच्या मालकीसाठी मिळालेला हा विक्रमी महसूल ठरला. महिलांसाठी स्वतंत्र ट्वेन्टी-२० लीग आयोजित करणारी महाराष्ट्र क्रिकेट संघटना ही एकमेव राज्य संघटना असून, लीगला २४ जूनपासून सुरुवात होणार आहे. स्पर्धेत एकूण १३ सामने खेळले जातील.
एमसीएचे अध्यक्ष रोहित पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. पण, त्यांचा संदेश सचिव कलमेश पिसाळ यानी वाचून दाखवला. मला अभिमान आहे की एमसीए या नात्याने आम्हाला फ्रॅँचाईजी आधारीत महिला टी-२० लीगचे आयोजन करणारी पहिली संघटना म्हणून संधी मिळाली. गेल्या वर्षी एमपीएल खेळाडूंच्या लिलावात आम्ही महिला प्रिमियर लीगचे आयोजन करण्याचे वचन दिले होते. आम्ही आमचा शब्द पाळला आहे, असे रोहित पवार यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
एमपीएलने आमच्या खेळाडूंना त्यांची प्रतिभा दाखविण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले. मला खात्री आहे की महिला प्रिमियर लीग देखील आमच्या महिला क्रिकेटपटूंसाठी असेच व्यासपीठ बनले. मला विश्वास आहे की महिला प्रिमियर लीगमधून भविष्यातील भारतीय खेळाडू उदयास येतील, असेही पवार यांनी आपल्या संदेशात नमूद केले.
एमपीएल आणि महिला प्रिमियर लीग चे अध्यक्ष सचिन मुळ्ये यांनी लिलावाचा तपशील आणि प्रक्रिया सर्व बोलीदारांपुढे सादर केली. एमपीएलमधील पुणेरी बाप्पा संघाचे मालक असलेल्या सुहाना सह्याद्री सुजनिल्स ४ एस समूहाने महिला प्रिमियर लीगमध्ये देखिल पुणे संघासाठी सर्वाधिक ५.१ कोटी रुपयाची बोली लावली. महिला संघ देखिल पुणेरी बाप्पा संघाने ओळखला जाईल. फ्रॅँचाईजीने भारताची उपकर्णधार स्मृती मानधनाची आपल्या संघाची आयकॉन खेळाडू म्हणून निवड केली.
वाई एंटरप्रायझेस प्रायव्हेट लिमिटेडने नाशिक संघासाठी ३.८ कोटी रुपयाची दुसरी सर्वोत्तम बोली लावली. त्यांनी भारताची आंतरराष्ट्रीय खेळाडू अनुजा पाटीलची आयकॉन खेळाडू म्हणून निवड केली.
सोलापूर रॉयल्सची मालकी असलेल्या कपिल सन्स समूहाने या वेळी रत्नागिरी संघासाठी ३.६ कोटी रुपयांची बोली लावली. कंपनीने पुढे आपल्या शहर आणि जिल्ह्यातील बदलाचा निर्णय घेत रायगड सोबत जाण्याचा निर्णय घेतला. या संघाचे नाव रायगड रॉयल्स असे असेल. या संघाने आक्रमक फलंदाज आंतरराष्ट्रीय खेळाडू किरण नवगिरे आपली आयकॉन खेळाडू म्हणून निवडले.
रॉयल जिनियस स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडने ३.४ कोटी रुपयांत सोलापूर संघाची मालकी घेतली. त्यांनी देविका वैद्यला आयकॉन खेळाडू म्हणून निवडले.
लिलावापूर्वी एमसीएसच्या सर्वोच्च परिषदेचे सदस्य विनायक द्रविड, राजू काणे, रणजित खिरीड, सुशील शेवाळे, सुनील मुथा यांनी संघ मालकांचा सत्कार केला. कल्पना तापीकर यांनी आभार मानले आणि महिला प्रिमियर लीग महाराष्ट्रातील महिला क्रिकेटसाठी बदलाचे पाऊल ठरेल असे मत व्यक्त केले.