इंग्लंडचा संघ सध्या भारत दौऱ्यावर असून उभय संघांमध्ये चार कसोटी सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. यातील पहिले दोन सामने चेन्नई येथे पार पडले असून त्यातील पहिला सामना पाहुण्या इंग्लंड संघाने तर दुसरा सामना यजमान भारतीय संघाने जिंकला. त्यामुळे १-१ अशा बरोबरीत असलेल्या या मालिकेचा निकाल अहमदाबाद येथील उर्वरित दोन सामान्यांनंतर लागेल.
या मालिकेच्या तिसऱ्या सामन्याला उद्यापासून म्हणजेच २४ फेब्रुवारीपासून अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर प्रारंभ होईल. गुलाबी चेंडूने प्रकाशझोतात खेळवला जाणारा हा सामना भारतीय कर्णधार विराट कोहलीसाठी खास ठरू शकतो. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने या सामन्यात विजय मिळवल्यास कोहली माजी कर्णधार एमएस धोनीला मागे टाकत भारतीय भूमीवर सर्वाधिक कसोटी विजय मिळवणारा कर्णधार ठरेल. मात्र हा रेकॉर्ड आपल्यासाठी फार महत्वाचा नाही, अशी प्रतिक्रिया कोहलीने सामन्यांच्या पूर्वसंध्येला दिली.
“या रेकॉर्डमुळे फारसा फरक पडत नाही”
चेन्नई येथील इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवून विराट कोहलीने भारतीय भूमीवरील कर्णधार म्हणून सर्वाधिक विजय मिळवण्याच्या यादीत धोनीची बरोबरी केली होती. त्यामुळे यापुढील भारतातील कसोटी सामन्यात कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने विजय मिळवताच तो अव्वल स्थानी पोहोचेल. याबाबत आभासी पत्रकार परिषदेत प्रश्न विचारला गेला असता कोहली म्हणाला, “कर्णधार म्हणून केलेला रेकॉर्ड माझ्यासाठी फार महत्वाचा नाही. तुम्ही सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करावे, यासाठी ती एक जबाबदारी आहे. हा रेकॉर्ड पाहण्यासाठी म्हणून छान वाटतो. मात्र यामुळे फारसा फरक पडत नाही.”
अर्थात, हा सामना भारतीय संघासाठी कोहलीच्या रेकॉर्डच्या दृष्टीतूनच नव्हे तर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी देखील अतिशय महत्वाचा आहे. अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी भारताला किमान एका सामन्यात विजय आणि एक सामना अनिर्णीत राखणे गरजेचे आहे. मात्र भारताला पराभवाचा सामना करावा लागल्यास त्यांच्या अंतिम फेरीत जाण्याच्या आशा धुळीला मिळतील.
याबाबत बोलताना कोहली म्हणाला, “आम्ही एक सामन्यात विजय आणि एक सामना अनिर्णीत ठेवणे, असा प्रयत्न नाही करणार आहोत. दोन्ही सामने जिंकण्याचे आमचे लक्ष्य आहे. आमच्यासाठी हे केवळ क्रिकेटचे दोन सामने आहेत आणि आम्ही त्यावरच लक्ष केंद्रित करणार आहोत. त्याच्यानंतर काय होईल, याकडे आम्ही तेव्हाच लक्ष देऊ. आत्ता आम्ही आमच्या हातातील गोष्टींवर लक्ष केंद्रित करत आहोत.”
महत्वाच्या बातम्या:
डबल धमाका! अहमदाबाद कसोटीत द्विशतक झळकावणारे ५ धुरंधर, तिघे आहेत भारतीय
विराट कोहलीसह खेळण्याबाबत सूर्यकुमार यादवने दिली प्रतिक्रिया, म्हणाला