इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाचा दुसरा टप्पा संयुक्त अरब अमिराती येथे रविवारपासून (१९ सप्टेंबर) सुरु होत आहे. दुसऱ्या टप्प्याला चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघातील सामन्याने सुरुवात होईल. या टप्प्यात एकून ३१ सामने होणार असून २७ दिवसापर्यंत स्पर्धा रंगेल. १५ ऑक्टोबर रोजी अंतिम सामना खेळवला जाईल.
आयपीएल २०२१ हंगामाचा पहिला टप्पा एप्रिल-मे दरम्यान भारतात पार पडला होता. त्यावेळी २९ सामन्यांनतर कोरोनाच्या संकटामुळे हा हंगाम स्थगित करावा लागला होता. या पहिल्या टप्पात अनेक रंगतदार सामने पाहायला मिळाले होते. या सामन्यांतील काही आकडेवारीचा या लेखातून आढावा घेऊ.
सर्वाधिक धावा
आयपीएल २०२१ च्या पहिल्या टप्प्यानंतर सर्वाधिक धावांचा विक्रम दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर शिखर धवनच्या नावावर आहे. त्याने ८ सामन्यांत ५४.२८ च्या सरासरीने ३८० धावा केल्या आहेत. त्याच्या पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर ३३१ धावांसर पंजाब किंग्सचा कर्णधार केएल राहुल आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर ३२० धावांसह चेन्नई सुपर किंग्सचा सलामीवीर फाफ डू प्लेसिस आहे.
सर्वाधिक विकेट्स
आयपीएल २०२१ च्या पहिल्या टप्प्यात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अव्वल क्रमांकावर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा गोलंदाज हर्षल पटेल असून त्याने ७ सामन्यांत १७ विकेट्स घेतल्या आहेत. या यादीत त्याच्या पाठोपाठ प्रत्येकी १४ विकेट्ससह दिल्ली कॅपिटल्सचा अवेश खान आणि राजस्थान रॉयल्सचा ख्रिस मॉरीस आहे.
सर्वाधिक चौकार आणि षटकार
आयपीएल म्हटलं की चौकार-षटकारांची चर्चा तर होतच राहाते. यंदा आयपीएल २०२१ च्या पहिल्या टप्प्यानंतर सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम केएल राहुलच्या नावावर असून त्याने ७ सामन्यांत १७ षटकार मारले आहेत. तर त्याच्या पाठोपाठ १५ षटकारांसह सनरायझर्स हैदराबादचा जॉनी बेअरस्टो दुसऱ्या क्रमांकावर आहे.
सर्वाधिक चौकार ठोकण्याच्या बाबतीत शिखर धवन अव्वल क्रमांकावर असून त्याने ८ सामन्यांत ४३ चौकार ठोकले आहेत. तसेच त्याचाच संघसहकारी पृथ्वी शॉ ३७ चौकारांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर, २९ चौकारांसह फाफ डू प्लेसिस तिसऱ्या क्रमांकावर आहे.
याशिवाय सर्वात लांब षटकार मारण्याचा विक्रम कायरन पोलार्डने केला असून त्याने १०५ मीटरचा षटकार मारला होता.
सर्वाधिक झेल
पहिल्या टप्पात सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रम चेन्नई सुपर किंग्सचा दिग्गज अष्टपैलू रविंद्र जडेजाच्या नावावर आहे. नेहमीच आपल्या उत्तम क्षेत्ररक्षणासाठी ओळखल्या जाणाऱ्या जडेजाने ७ सामन्यांत ८ झेल घेतले आहेत.
सर्वात जलद अर्धशतक
वेगवान खेळ ही आयपीएलची ओळख आहे. आयपीएल २०२१ च्या पहिल्या टप्प्यात सर्वात जलद अर्धशतक करण्याचा विक्रम मुंबई इंडियन्सचा धाकड अष्टपैलू कायरन पोलार्डच्या नावावर आहे. त्याने १ मे २०२१ रोजी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध १७ चेंडूत अर्धशतक केले होते. त्याच्या पाठोपाठ दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर पृथ्वी शॉ असून त्याने २९ एप्रिल २०२१ रोजी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध १८ चेंडूत अर्धशतक केले होते.
तीन खेळाडूंनी केले शतक
आयपीएल २०२१ च्या पहिल्या टप्प्यात ३ खेळाडूंनी शतक झळकावले. यात संजू सॅमसन, देवदत्त पडीक्कल आणि जोस बटलर यांचा समावेश आहे. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार सॅमसनने पंजाब किंग्स विरुद्ध ६३ चेंडूत ११९ धावांची खेळी केली होती. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा युवा फलंदाज पडीक्कलने राजस्थान रॉयल्सविरुद्ध ५१ चेंडूत १०१ धावांची खेळी केली होती. तर, राजस्थान रॉयल्सच्या बटलरने सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध ५६ चेंडूत १२४ धावा केल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या –
सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून भारतीय महिला संघाचा पराभव, पूजा वस्त्राकरची झुंज अपयशी
विराटने का सोडले नाही वनडे संघाचे नेतृत्व? लावला जातोय ‘हा’ अंदाज