यजमान ईस्ट बंगाल एफसी अजूनही हिरो इंडियन सुपर लीगच्या २०२२-२३ ( आयएसएल) टॉप सहामध्ये स्थान पटकावण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. शुक्रवारी (16 डिसेंबर) घरच्या मैदानावर त्यांना पुन्हा नंबर वनसाठी प्रयत्नशील असणाऱ्या मुंबई सिटी एफसीचा सामना करायचा आहे. विवेकानंद युवा भारती क्रीडांगणा येथे होणाऱ्या या सामन्यात यजमान ईस्ट बंगालचे पारडे जड वाटत असेल तरी हिरो आयएसएलच्या यंदाच्या पर्वात अपराजित राहणारा एकमेव संघ मुंबईचा त्यांना सामना करणे सोपे नक्की नसेल.
घरच्या मैदानावर ईस्ट बंगाल एफसीला तीनपैकी तीनही सामने गमवावे लागले आहेत. या तीन सामन्यांत त्यांनी केवळ तीन गोल केले, तर प्रतिस्पर्धींनी ७ गोल केले. मागील सामन्यात स्टीफन कॉन्स्टन्टाईन यांच्या संघाला यंदाच्या पर्वात सलग तिसऱ्यांदा गोल करण्यात अपयश आले. गतविजेत्या हैदराबाद एफसीने २-० अशा फरकाने हा सामना जिंकला.
स्ट्रायकर क्लेईटन सिल्व्हा याला यंदाच्या पर्वात काही खास कामगिरी करता आलेली नाही, परंतु त्याने मागील काही सामन्यांत दोन गोल करून लय मिळवली आहे. ९ सामन्यात ब्राझीलियन खेळाडूला ५ गोल करता आले आहेत. सहकारी नाओरेम सिंग हा गोल सहाय्य करण्यात मोलाचे योगदान देतोय आणि उद्याच्या सामन्यात एक सहाय्य त्याला मुंबई सिटी एफसीच्या ग्रेग स्टीवर्टच्या सर्वाधिक गोल सहाय्य करण्याच्या विक्रमाशी बरोबरी करून देणारा ठरेल.
”मुंबई सिटी एफसीचा संघ आव्हानात्मक आहे आणि त्यांनी त्यांच्या कामगिरीतून ते दाखवून दिले आहे. आम्ही अन्य संघांसोबत जशी तुल्यबळ लढत देतो, तशीच मुंबई सिटीविरुद्ध करणार आहोत. यंदाच्या पर्वात आम्हाला अन्य कोणत्या संघाकडून लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला, असे मला वाटत नाही. आम्हाला नशिबाची साथ नाही मिळाली आणि काही चुका आम्ही केल्या. त्याचा फटका आम्हाला बसला. आशा करतो की आमच्या खेळात सुधारणा होईल,”असे कॉन्स्टन्टाईन म्हणाले.
यंदाच्या पर्वात मुंबई सिटी हा एकमेव अपराजित संघ आहे आणि त्यांचा रेकॉर्ड दमदार राहिला आहे. यंदाच्या पर्वात घराबाहेर खेळलेल्या चारपैकी तीन सामने त्यांनी जिंकले आहेत. हैदराबाद एफसीविरुद्धच्या सलामीचा सामना त्यांनी ड्रॉ केलेला. डेस बकिंगहॅमचा हा संघ पुरेशी विश्रांती घेऊन आता मैदानावर उतरणार आहे.
मॅच विक ९मध्ये मुंबई सिटी एफसीने ४-१ अशा फरकाने एफसी गोवाचा पराभव केला होता. जॉर्ज डिएझ हा यंदाच्या पर्वात ९ सामन्यांत क्लबकडून सर्वाधिक ६ गोल करणारा खेळाडू आहे. अर्जेंटियन स्ट्रायकर हा हैदराबाद एफसीच्या अल खयातीनंतर ( ७) दुसऱ्या क्रमांकावर आहे. पण, सर्वाधिक ६ गोल सहाय्य करून स्टीवर्ट अव्वल स्थानावर आहे.
”स्टीफन कॉन्स्टन्टाईन हे चांगले प्रशिक्षक आहेत आणि त्यांच्याकडे भारताचा चांगला अनुभव आहे. आपल्या खेळाडूंकडून सर्वोत्तम कामगिरी कशी करून घ्यायची, याची त्यांना जाण आहे आणि त्यांनी आतापर्यंत संघासोबत चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे हा सामना आव्हानात्मक असेल. आम्ही याही सामन्यात सर्वोत्तम खेळण्याचाच प्रयत्न करू आणि जो निकाल हवा आहे तो मिळवू,”असे बकिंगहॅम म्हणाले.
उभय संघांमध्ये चार सामने झाले आहेत आणि त्यात मुंबई सिटीने तीन विजय मिळवले आहेत. १ सामना ड्रॉ राहिला आहे. ड्युरँड चषक स्पर्धेत उभय संघ समोरासमोर आले होते आणि त्यात ईस्ट बंगाल एफसीने ४-३ अशा फरकाने मुंबई सिटी एफसीवर विजय मिळवला होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘मला कोणीतरी खरेदी करणारच’; 15 वर्षाच्या घझनफारने व्यक्त केला आत्मविश्वास; भारतीय दिग्गजाला मानतो आदर्श
नेतृत्व सोडल्यानंतर विलियम्सनने केली खास इंस्टा पोस्ट; छायाचित्र वेधून घेतेय लक्ष