जगातील सर्वात प्रसिद्ध व्यवसायिक टी२० लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) १४ वा हंगाम कोरोनाच्या भारतातील दुसऱ्या लाटेमुळे २९ सामन्यानंतर अचानकपणे स्थगित करण्यात आला आहे. खेळाडू व कर्मचारी कोरोनाबाधित आढळल्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) हा निर्णय घेतला होता. मात्र, काही दिवसांपूर्वीच बीसीसीआयने उर्वरित हंगाम संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे खेळविणार असल्याचे स्पष्ट केले. आता ही स्पर्धा ज्या मैदानावर होणार आहे, त्या मैदानांची नावे देखील समोर आली आहेत.
या मैदानांवर खेळवली जाणार स्पर्धा
आयपीएल मध्यात स्थगित झाल्यानंतर बीसीसीआयने हर तऱ्हेने हंगाम पूर्ण करण्याचा प्रयत्न चालवला होता. त्यानंतर युएईमध्ये स्पर्धा आयोजित करण्यास परवानगी मिळाली. एका प्रमुख वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, ‘आयपीएल २०२१ चा उर्वरित हंगाम युएईमधील शारजा (शारजा क्रिकेट ग्राउंड), अबुधाबी (शेख झायद आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम) व दुबई (दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम) येथे खेळवला जाईल. आयपीएल २०२१ मध्ये ६० सामने खेळविले जाणार होते. त्यापैकी २९ सामने पूर्ण झाले आहेत. बाकी ३१ सामने १० सप्टेंबर ते १० ऑक्टोबर या कालावधीत होतील. या ३१ सामन्यांपैकी १० दिवस डबल हेडर म्हणजे दिवसात दोन सामने, ७ दिवस एक सामना व ४ प्ले ऑफ सामने असतील.’
आयपीएलनंतर टी२० विश्वचषक देखील खेळला जाणार आहे. विश्वचषकाचे आयोजनदेखील भारतात होण्याचे निश्चित झालेले. मात्र, भारतातील कोरोना परिस्थिती कशी असेल यावर सर्व अवलंबून आहे. याबाबतच बीसीसीआयची २९ मे तर आयसीसीची १ जून रोजी बैठक होईल.
मागील हंगाम झाला होता युएईत आयोजित
भारतातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आयपीएल २०२० देखील युएई येथेच आयोजित केली गेलेली. खेळाडूंना सुरक्षित बायो-बबल व इतर सर्व सुविधा पुरवल्या गेल्याने कोणताही खेळाडू स्पर्धेदरम्यान कोरोना पॉझिटिव्ह आढळला नाही व स्पर्धा निर्विघ्न पार पडली. मुंबई इंडियन्सने अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करत आपले पाचवे आयपीएल विजेतेपद पटकावले होते.
हेही वाचा-
–नुसता पैसा!! विराट कोहलीपेक्षा दुप्पट कमावतात महागुरु रवी शास्त्री, पाहा किती आहे वार्षिक कमाई
–जर तो तुझ्यासमोर आला तर धक्का मारुन खाली पाड, बांगलादेशच्या क्रिकेटपटूच्या अखिलाडूवृत्तीचा व्हिडिओ व्हायरल
–WTC Final: भारताची ही जोडी खूपच खतरनाक, न्यूझीलंडच्या बड्या फलंदाजाने घेतली धसकी






