सध्या भारतात इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल २०२२) पंधरावा हंगाम खेळला जात आहे. याच वेळी आता बातमी येत आहे की, जुलै-ऑगस्ट महिन्यात भारतीय संघ अमेरिकेत वेस्ट इंडिजविरुद्ध मर्यादित षटकांच्या क्रिकेट मालिका खेळेल. एका क्रिकेट संकेतस्थळाने वेस्टइंडीज क्रिकेट बोर्डाच्या सूत्रांच्या हवाल्याने ही खबर दिली आहे.
अशी असू शकते मालिका
मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय क्रिकेट संघ जुलै महिन्याच्या अखेरीस वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाईल. या दौऱ्यावर भारतीय संघ तीन सामन्यांच्या वनडे व पाच सामन्यांच्या टी२० मालिकेत सहभाग घेईल. यापैकी अखेरचे दोन सामने अमेरिकेतील फ्लोरिडा येथे खेळले जातील. फ्लोरिडा येथील या मैदानावर आत्तापर्यंत सहा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळले गेले आहेत. भारतीय संघाने २०१६ व २०१९ दौऱ्यावेळी येथे सामने खेळले होते.
असा असू शकतो दौरा
भारतीय संघातील सर्व खेळाडू सध्या आयपीएल खेळत आहेत. त्यानंतर, भारतीय संघ जून महिन्यात इंग्लंडचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात मर्यादित षटकांच्या मालिका होतील. तसेच, २०२१ दौऱ्यावेळी शिल्लक असलेली एक कसोटी देखील मॅंचेस्टर येथे खेळली जाईल. त्यानंतर भारतीय संघातील खेळाडू येथूनच वेस्ट इंडीजला रवाना होतील. जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात वेस्ट इंडिज विरुद्ध मालिका सुरू होण्याची शक्यता आहे. या मालिका ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संपतील. त्यानंतर २९ ऑगस्टपासून कॅरिबियन प्रीमियर लीग सुरू होणार आहे.
भारतीय संघाने केला सुपडा साफ
नुकताच वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने भारताचा दौरा केला होता. प्रत्येकी तीन सामन्यांच्या टी२० व वनडे मालिकेत भारतीय संघाने कायरन पोलार्डच्या नेतृत्वातील वेस्ट इंडीज संघाला सर्व सहा सामन्यांमध्ये पराभूत केले होते. तसेच, २०१९ मध्ये भारतीय संघाने वेस्ट इंडीज दौऱ्यावरही विजय मिळवलेला.
महत्वाच्या बातम्या-






