---Advertisement---

रिंकूचं 19वं षटक, सूर्याचं 20वं षटक अन् सुंदरनं सुपर ओव्हरमध्ये गेम केला! भारत विरुद्ध श्रीलंका सामन्याचा संपूर्ण थरार

On: बुधवार, जुलै 31, 2024 8:30 AM
---Advertisement---

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत श्रीलंकेचा व्हाईटवॉश केला आहे. उभय संघांमध्ये मंगळवारी (30 जुलै) पल्लेकेले स्टेडियमवर खेळला गेलेला शेवटचा सामना खूपच रोमांचक होता. या सामन्याचा निकाल सुपर ओव्हरमध्ये लागला.

भारतानं प्रथम फलंदाजी करताना 138/9 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, श्रीलंकेनंही 8 गडी गमावून तेवढ्याच धावा केल्या. एकवेळ भारत पराभवाकडे वाटचाल करत होता, परंतु सूर्यकुमार यादव आणि रिंकू सिंह यांनी चमत्कार केला. या दोघांनी अखेरच्या दोन षटकांत श्रीलंकेच्या जबड्यातून विजय हिसकावून घेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. उर्वरित काम वॉशिंग्टन सुंदरनं सुपर ओव्हरमध्ये पूर्ण केलं.

शेवटच्या 12 चेंडूत श्रीलंकेला विजयासाठी 8 धावांची गरज होती. अशा स्थितीत कर्णधार सूर्यानं रिंकूकडे चेंडू सोपवून सर्वांना आश्चर्यचकित केलं. रिंकूनं 19व्या षटकात घातक गोलंदाजी करत कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवला. त्यानं अवघ्या 3 धावा दिल्या आणि 2 गडी बाद केले.

रिंकूनं पहिला चेंडू डॉट टाकला. पुढच्या चेंडूवर त्यानं कुसल परेराला (34 चेंडूत 46 धावा) झेलबाद केलं. कामिंदू मेंडिसनं (1) तिसऱ्या चेंडूवर एक तर रमेश मेंडिसनं (3) चौथ्या चेंडूवर दोन धावा घेतल्या. पाचव्या चेंडूवर एकही धाव आली नाही. सहाव्या चेंडूवर रिंकूनं रमेशला बाद केलं. आता श्रीलंकेला शेवटच्या षटकात 6 धावांची गरज होती.

20व्या षटकातही सूर्यानं आश्चर्यकारक निर्णय घेतला. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजच्या जागी तो स्वत: गोलंदाजी करायला आला. सूर्यानं पहिल्या चेंडूवर एकही धाव दिली नाही आणि पुढच्या चेंडूवर कामिंदूला आपल्या जाळ्यात अडकवलं. कर्णधारानं तिसऱ्या चेंडूवर महिष तिक्ष्णाला बाद केलं, ज्यानं खातंही उघडलं नाही. असिथा फर्नांडोनं चौथ्या चेंडूवर एक धाव घेतली. चामिंडू विक्रमसिंघेनं पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर दोन धावा घेतल्या. सूर्याला त्याला धावबाद करण्याची संधी होती, पण तो चुकला. श्रीलंकेला शेवटच्या चेंडूवर तीन धावांची गरज होती, पण विक्रमसिंघे केवळ दोन धावा करू शकला. यानंतर सामना बरोबरीत सुटला आणि सुपर ओव्हरमध्ये पोहोचला.

सुपर ओव्हरमध्ये अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरनं श्रीलंकेचा बँड वाजवला. त्यानं षटकाची सुरुवात वाईडनं केली. त्यानंतर कुसल मेंडिसनं एक धाव घेतली. सुंदरनं दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर कुसल मेंडिस आणि पाथुम निसांकाला बाद केलं. अशाप्रकारे श्रीलंकेचा संघ सुपर ओव्हरमध्ये फक्त 2 धावा करू शकला. आता भारताला विजयासाठी अवघ्या तीन धावा करायच्या होत्या. श्रीलंकेकडून गोलंदाजीला आलेल्या तिक्ष्णाच्या पहिल्याच चेंडूवर सूर्यानं चौकार मारून भारताला रोमहर्षक विजय मिळवून दिला.

हेही वाचा – 

रिंकू-सूर्याची गोलंदाजी अन् सामना टाय! भारत विरुद्ध श्रीलंका मालिकेचा रोमहर्षक शेवट
IND vs SL सलग दोन वेळा ‘हा’ खेळाडू शून्यावर बाद, चाहत्यांनी दिला निवृत्तीचा सल्ला
श्रीलंकेत असूनही दुरावा, भारताच्या 6 खेळाडूंचा वेगळा सराव; कोच गंभीरच्या डोक्यात नेमकं काय आहे?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---