भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात रविवारी (१२ जून) कटकच्या बाराबती स्टेडियमवर ५ सामन्यांच्या टी२० मालिकेतील दुसरा सामना खेळला जाणार आहे. यजमान भारतीय संघ या मालिकेत ०-१ ने पिछाडीवर आहे. त्यामुळे हा सामना जिंकत मालिकेत बरोबरी साधण्यासाठी भारतीय संघ प्रयत्नशील असेल. या सामन्यादरम्यान भारतीय संघाचा प्रभारी कर्णधार रिषभ पंत याला आणखी एक मानाचा तुरा शिरपेचात नोंदवण्याची संधी असेल.
जर पंतने (Rishabh Pant) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या टी२० सामन्यात (Second T20I) एक जरी षटकार मारला तर, तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपले १०० षटकार (Hundred International Sixes) पूर्ण करेल.
२४ वर्षीय पंतने २०१७ मध्ये इंग्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. तेव्हापासून ते आतापर्यंत तो भारतीय संघाचा क्रिकेटच्या तिन्ही विभागातील प्रमुख खेळाडू बनला आहे. पंतने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ९९ षटकार ठोकले आहेत. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत ३० सामने खेळताना ५१ डावांमध्ये फलंदाजी करत ४४ षटकार मारले आहेत. वनडे क्रिकेटमध्ये त्याला जास्त संधी मिळालेली नाही. त्याने २४ वनडे सामन्यातील २२ डावांमध्ये फलंदाजी करताना २४ षटकार मारले आहेत. तर टी२० क्रिकेटमध्ये ४४ सामन्यांमधील ३८ डावांमध्ये फलंदाजी करताना ३१ षटकार ठोकले आहेत.
अशात आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पंतने एक जरी चेंडू षटकारासाठी पाठवला, तरीही तो षटकारांचे शतक पूर्ण करू शकतो.
रिषभ पंतकडे पहिल्यांदाच सोपवण्यात आलेय नेतृत्त्वपद
पंतसाठी दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी२० मालिका अतिशय खास आहे. २४ वर्षीय पंतला पहिल्यांदाच टी२० क्रिकेटमध्ये भारतीय संघाची कमान सांभाळण्याची संधी मिळाली आहे. परंतु पंतसाठी ही मालिका अनेक आव्हानांनी भरलेली आहे. कारण सध्या भारतीय संघातील बरेच अनुभवी खेळाडू विश्रांतीवर आहेत. अशा नव्या संघासह बलाढ्य दक्षिण आफ्रिकेचा सामना करणे हे पंतपुढील सर्वात मोठे आव्हान आहे.
त्याला आपल्या नेतृत्त्वाखालील पहिला सामना संघाला जिंकवून देण्यात अपयश आले आहे. भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिला टी२० सामना ७ विकेट्स राखून गमावला होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘किलर’ मिलरचा काटा काढण्यासाठी द्रविड गुरू आखू शकतात ‘या’ ४ रणनीती, वाचा सविस्तर