भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याने मागील काही काळात आपल्या यष्टीपुढील आणि यष्टीमागील प्रदर्शनात बऱ्याच सुधारणा केल्या आहेत. आपल्या लक्षणीय कामगिरीच्या जोरावर त्याने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तो सध्या भारतीय संघाचा पहिल्या पसंतीचा यष्टीरक्षक बनला आहे. असे असले तरीही, अजूनही पंतची तुलना माजी भारतीय यष्टीरक्षक एमएस धोनी याच्यासोबत होत असते. याचा परिणाम पंतच्या मनोबळावर होऊ शकतो, असे त्याच्या बालपणीच्या प्रशिक्षक तारक सिन्हा यांचे म्हणणे आहे.
विश्वचषक २०१९ नंतर धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर पंत हा त्याचा पर्यायी खेळाडू ठरेल, असे मानले जात होते. दुर्दैवाने धोनीसोबतच्या तुलना सत्राचा परिणाम पंतच्या प्रदर्शनावर झाला आणि क्रिकेटच्या तिन्ही स्वरुपातून त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. जर आताही त्यांची तुलना होत राहिली; तर हेच चित्र पुन्हा घडू शकते, असे सांगत प्रशिक्षक सिन्हा यांनी संताप व्यक्त केला आहे.
‘न्यूज १८ क्रिकेट नेक्स्ट’शी बोलताना सिन्हा म्हणाले की, “रोहन गावसकर हा वाईट खेळाडू नव्हता. परंतु त्याला नेहमी आठवन करुन दिली जायची की, तो त्याच्या वडीलांच्या (सुनिल गावसकर) जवळपासही नाही. पंतसोबतही असेच काहीसे होत आहे. खूप दुर्मिळ असे खेळाडू असतात, ज्यांच्यात अशा तुलना सहण्याची शक्ती असते. तरीही मी सतत सांगत असतो की, पंतची इच्छाशक्तीच त्याची सर्वात मोठी ताकद आहे. यामुळेच त्याने पुन्हा आपल्या खेळावर लक्ष केंद्रित केले आहे.”
“पंत अगदी धोनीप्रमाणे स्वत:चा पाया भक्कम करण्याची संधी दिली गेली पाहिजे. पंत हा एक गेमचेंजर आणि वेगाने गोष्टी शिकणारा खेळाडू आहे. परंतु पुन्हा-पुन्हा त्याची धोनीशी तुलना का करायची? आपणा सर्वांना ही गोष्ट मान्य करावी लागेल की, अगदी धोनीलाही स्वत:ला सिद्ध करण्यासाठी थोडा वेळ लागला होता. त्यामुळे पंतच्या बाबतीतही सर्वांनी संयम बाळगण्याची गरज आहे. त्याचीही वेळ येईल. त्याने आता तर त्याची कारकिर्दीची सुरुवात केली आहे,” असे त्यांनी शेवटी म्हटले.
महत्त्वाच्या बातम्या-
बिग ब्रेकिंग! आयपीएल २०२१चे राहिलेले सामने होणार ‘या’ देशात, बीसीसीआयने शनिवारी घेतला निर्णय
कसोटी चॅम्पियनशीप फायनलमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या जर्सीत, पाहून आठवतील जुने दिवस
धोनी की कोहली, कोण आहे श्रेष्ठ कर्णधार? १८ शतके करणाऱ्या माजी क्रिकेटपटूने दिले उत्तर