भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेली पाच सामन्यांची कसोटी मालिका आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 चा पाचवा कसोटी सामना 3 जानेवारी पासून खेळला जाईल. हा सामना जिंकून मालिका ड्रॉ करण्याचं भारतीय संघाचं उद्दिष्ट असेल. परंतु रिषभ पंतमुळे टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या आहेत. तो या मालिकेत अनेकवेळा बेजबाबदार शॉट्स खेळून बाद झाला आहे. अशा परिस्थितीत पंतला सिडनी कसोटीतून वगळलं जाऊ शकतं. रिपोर्ट्सनुसार, रिषभ पंतच्या जागी ध्रुव जुरेलला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळू शकते.
मेलबर्न कसोटीत रिषभ पंतनं अनेक चुका केल्या होत्या. संघाला सावधानतेनं खेळण्याची आवश्यकता असताना त्यानं नॅथन लायनच्या चेंडूवर जोखमीचा फटका खेळला आणि तो मिचेल मार्शच्या हाती झेलबाद झाला. यानंतर भारतीय संघ 121/3 वरून 155 धावांवर ऑलआऊट झाला आणि सामना 184 धावांनी गमावला. पंतच्या या कामगिरीमुळे टीम मॅनेजमेंटला त्याच्या संघातील स्थानावर पुनर्विचार करण्यास भाग पाडलं आहे.
रिषभ पंतच्या निराशाजनक कामगिरीनंतर युवा यष्टीरक्षक फलंदाज ध्रुव जुरेलचं नाव चर्चेत आहे. मालिकेपूर्वी भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ यांच्यात झालेल्या सामन्यात जुरेलनं चमकदार कामगिरी केली होती. मेलबर्नमध्ये त्यानं 80 आणि 68 धावांचे दोन महत्त्वपूर्ण डाव खेळले होते. याशिवाय त्यानं इराणी ट्रॉफीमध्ये 93 धावा करून आपलं महत्त्व सिद्ध केलं.
ध्रुव जुरेलचा प्रथम श्रेणीचा रेकॉर्ड रिषभ पंतच्या तुलनेत सरस आहे. त्यानं 22 सामन्यात 45.74 च्या सरासरीनं 1235 धावा केल्या आहेत. जुरेलनं भारतीय संघासाठी 6 डावात 40.40 च्या सरासरीनं 202 धावा केल्या आहेत. यात एका अर्धशतकाचाही समावेश आहे.
हेही वाचा –
आयसीसी क्रमवारीत बुमराहने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय गोलंदाज
2024 साली जगाचा निरोप घेणारे 5 दिग्गज क्रिकेटपटू, 3 भारतीयांचाही यादीत समावेश
शेवटची कसोटी ड्राॅ राहिली, तर भारत WTCच्या फायनलमध्ये पोहोचणार का? कसं आहे समीकरण