इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) चौदाव्या हंगामातील दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात बुधवारी (१३ ऑक्टोबर) दिल्ली कॅपिटल्सचा सामना शारजाह क्रिकेट स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्सशी झाला. या सामन्यात कोलकाताने ३ गडी राखून थरारक विजय मिळवत तिसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला. या सामन्यात पराभूत झाल्यानंतर दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतने अत्यंत भावनिक प्रतिक्रिया दिली.
भावनिक झाला पंत
जवळपास गमावलेल्या सामन्यात पुनरागमन करत दिल्लीच्या गोलंदाजांनी सामना अखेरच्या षटकापर्यंत नेला. मात्र, राहुल त्रिपाठीने पाचव्या चेंडूवर उत्तुंग षटकार ठोकत केकेआरला विजय मिळवून दिला. या उत्कंठावर्धक सामन्यानंतर बोलताना दिल्लीचा कर्णधार रिषभ पंत म्हणाला,
“माझ्याकडे सध्या व्यक्त करण्यासाठी शब्द नाहीत. मी काहीही सांगू शकत नाही. आम्ही सामना जिंकू यावर विश्वास ठेवलेला. आम्ही सामना शक्य तितक्या अखेरपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला. गोलंदाजांनी हे काम जवळजवळ पूर्ण केलेले. पण, दुर्दैवाने निकाल आमच्या बाजूने लागला नाही. त्यांनी मधल्या षटकांत खूप चांगली गोलंदाजी केली, आम्ही अडकलो आणि स्ट्राइक बदलू शकलो नाही. दिल्ली कॅपिटल्स सकारात्मक क्रिकेट खेळण्यासाठी ओळखला जातो. आशा आहे की आम्ही पुढील हंगामात अधिक चांगल्या प्रकारे परत येऊ. आम्ही खरोखर चांगले क्रिकेट खेळलो. चढ -उतार असतील, पण आम्ही सकारात्मक राहू, एकमेकांसाठी असू, एकमेकांची काळजी घेऊ आणि आशा करतो की आम्ही पुढच्या हंगामात अधिक चांगले परत येऊ.”
दिल्लीची हुकली फायनलची संधी
शारजा येथे झालेल्या या सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना शिमरन हेटमायर, श्रेयस अय्यर व शिखर धवन यांच्या छोटेखानी खेळ्यांच्या जोरावर १३५ धावा उभ्या केल्या. प्रत्युत्तरात, व्यंकटेश अय्यर व शुबमन गिल यांनी ९६ धावांची सलामी देत सामना केकेआरच्या बाजुने झुकविला. त्यानंतर दिल्लीच्या गोलंदाजांनी झटपट 7 बळी मिळवत सामन्यात रंगत निर्माण केली. मात्र, राहुल त्रिपाठीने अखेरपर्यंत धैर्य दाखवात सामना आपल्या नावे केला. युवा सलामीवीर व्यंकटेश अय्यर याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. अंतिम सामना चेन्नईविरुद्ध दुबई येथे खेळला जाईल.