भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याला त्याच्या निर्भीड फलंदाजीबरोबरच त्याच्या मस्तीखोर स्वभावासाठीही ओळखले जाते. यष्टीमागे यष्टीरक्षण करताना तो बऱ्याचदा आपल्या विधानांनी संघ सहकाऱ्यांची अथवा प्रतिस्पर्धी खेळाडूंची खोड काढताना दिसला आहे. सोमवार रोजी (१९ ऑक्टोबर) इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात झालेल्या सराव सामन्यातही असेच काहीसे चित्र पाहायला मिळाले आहे.
या सामन्यादरम्यान पंत गोलंदाजी करण्यासाठी आलेल्या फिरकीपटू आर अश्विनसोबत मस्ती करताना दिसला आहे. त्याचा अश्विनसोबत यष्टीमागून गमतीशीर सल्ला देतानाचा आवाज स्टंप माईकमध्ये कैद झाला असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
प्रथम फलंदाजीस आलेल्या इंग्लंडच्या डावादरम्यान अश्विन एक षटक गोलंदाजी करण्यासाठी येतो. यावेळी गोलंदाजी करत असलेल्या अश्विनला यष्टीमागून पंत म्हणतो की, ‘तुझी इच्छा पूर्ण करुन घे अश्विन. हीच त्यासाठी योग्य संधी. लेग स्पिन करण्यास अनुकूल परिस्थितीही आहे आणि संधीही.’ पंतची ही मजेदार कमेंट स्टंप माइकमध्ये कैद झाली असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर धूमाकुळ घालतो आहे.
https://twitter.com/pant_fc/status/1450127670721744903?s=20
दुसरीकडे इंग्लंडविरुद्धच्या सराव सामन्यात अश्विनचे प्रदर्शन चांगले राहिले आहे. त्याला या सामन्यादरम्यान एकही विकेट घेता आली नाही. परंतु त्याने टाकलेल्या ४ षटकात जास्त धावाही खर्च केल्या नाहीत. त्याने ४ षटकांमध्ये फक्त २३ धावा दिल्या आहेत. तर या सामन्यात वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. परंतु इंग्लंडच्या फलंदाजांनी त्याला तितकाच चोपही दिला. त्याने ४ षटकांमध्ये तब्बल ४० धावा देत या विकेट्स काढल्या आहेत.
पंतच्या या सामन्यातील प्रदर्शनाबाबत बोलायचे झाल्यास, त्याने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येत आक्रमक खेळी केली. १४ चेंडूंचा सामना करताना ३ षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने त्याने नाबाद २९ धावा कुटल्या. सोबतच शेवटच्या चेंडूवर खणखणीत षटकार खेचत संघाला सामनाही जिंकून दिला आहे. भारताने इंग्लंडच्याविरुद्धच्या या सराव सामन्यात ७ विकेट्स राखून विजय मिळवला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-