भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी न्यूझीलंडच्या धावसंख्येला प्रत्युत्तर देताना भारतानं 81 धावांवर 4 विकेट गमावल्या होत्या. यामुळे भारतीय संघ थोडा संकटात सापडल्याचं वाटत होतं. मात्र आज भारताकडून यष्टीरक्षक रिषभ पंतनं शुबमन गिलच्या साथीनं प्रतिहल्ला करत संघाची धावसंख्या 150 च्या पुढे नेली. यादरम्यान पंतनं आपल्या कसोटी कारकिर्दीतील 13वं अर्धशतकही पूर्ण केलं आणि एक विशेष विक्रम आपल्या नावावर केला.
पहिल्या दिवसाच्या शेवटच्या षटकात फलंदाजीला आलेल्या रिषभ पंतनं दुसऱ्या दिवसाची आक्रमक सुरुवात करत फिरकी गोलंदाज एजाज पटेलच्या षटकात एकापाठोपाठ एक चौकार मारले. पंतनं चांगल्या चेंडूंचा आदर केला, मात्र त्यानं संधी मिळताच आक्रमक पवित्रा दाखवला. त्यानं 36 चेंडूंमध्ये सात चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीनं अर्धशतक पूर्ण केलं.
न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटीत भारतासाठी कोणत्याही फलंदाजानं केलेलं हे सर्वात जलद अर्धशतक आहे. पंतच्या आधी यशस्वी जयस्वालच्या नावावर हा विक्रम होता. जयस्वालनं पुणे कसोटीत न्यूझीलंडविरुद्ध 41 चेंडूत अर्धशतक झळकावलं होतं. आता पंतनं त्याचा हा रेकॉर्ड मागे टाकला आहे. रिषभ पंत 59 चेंडूत 60 धावा करून बाद झाला. त्यानं आपल्या खेळीत 8 चौकार आणि 2 षटकार मारले.
शुक्रवारी अखेरच्या सत्रात भारताचा डाव गडगडला. टीम इंडियानं यशस्वी जयस्वाल आणि विराट कोहली यांच्यासह तीन विकेट झटपट गमावल्या. त्यामुळे दुसऱ्या दिवशी भारताची स्थिती आणखी बिघडू शकते असं वाटत होतं, पण रिषभ पंत आणि शुबमन गिल यांनी तसं होऊ दिलं नाही. पंतनंतर गिलनंही शानदार अर्धशतकी खेळी खेळली.
हेही वाचा –
धक्कादायक! पाकिस्ताननंतर युएईकडून देखील भारताचा पराभव
भारतीय चाहत्यांना लवकर व्हिसा मिळणार, चॅम्पियन ट्रॉफीच्या आयोजनासाठी पाकिस्तानची नवी खेळी
गुजरातनं रिटेन केलेल्या खेळाडूचं ऑस्ट्रेलियात शतक! लवकरच मिळू शकते कसोटीत संधी