भारतीय यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतला बंगळुरू येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत त्याच गुडघ्याला दुखापत झाली, ज्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्याच्या गुडघ्याला कार अपघातात गंभीर दुखापत झाली होती. बंगळुरूमध्ये जेव्हा तो जखमी झाला, तेव्हा त्याला प्रचंड वेदना सहन कराव्या लागल्या, ज्यानंतर त्यानं मैदान सोडलं होतं. या घटनेनंतर तो संपूर्ण सामन्यात पुन्हा विकेटकीपिंगसाठी आला नाही. मात्र असं असतानाही त्यानं दुसऱ्या डावात शानदार फलंदाजी करताना 99 धावा ठोकल्या. आता पुणे येथे होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत पंतच्या खेळण्याबाबत कर्णधार रोहित शर्मानं मोठं अपडेट दिलं आहे.
पहिल्या कसोटीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना रोहित शर्मा म्हणाला, “पंतचं गुडघ्याचं मोठं ऑपरेशन झालं आहे. सावधगिरी बाळगणं चांगलं आहे. तो फलंदाजी करत असताना धावण्यात सहज वाटत नव्हता. आम्हाला त्याची जास्त काळजी घ्यावी लागेल. गेल्या काही वर्षांत त्याला खूप त्रास सहन करावा लागला आहे. तो आताही वेदना सहन करतोय. म्हणून आम्ही त्याला पुढील कसोटीपूर्वी अतिरिक्त विश्रांती देण्याचा निर्णय घेतला.”
कसोटी क्रिकेटमध्ये सहसा बेफिकीरपणे खेळणाऱ्या पंतनं या सामन्याच्या दुसऱ्या डावात अत्यंत हुशारीनं फलंदाजी केली. त्यानं चांगल्या चेंडूंचा आदर केला, तर खराब चेंडूंवर आक्रमक फटके मारले. पंत चांगल्या लयीत फलंदाजी करत होता. नव्वदीच्या घरात पोहोचल्यानंतर त्यानं 107 मीटर लांब षटकार मारून आपले इरादे आणखी स्पष्ट केले. मात्र दुर्दैवानं त्याचं शतक अवघ्या एका धावेनं हुकलं. तो 99च्या धावसंख्येवर विल्यम ओ’रुर्केच्या मागच्या लेन्थ बॉलला कट करण्याच्या प्रयत्नात बाद झाला. तो कसोटी क्रिकेटमध्ये तब्बल 7व्यांदा नव्वदीच्या घरात बाद झाला आहे. जर त्यानं या सर्व धावांचं शतकामध्ये रुपांतर केलं असतं, तर आज त्याचे कसोटीमध्ये 13 शतकं असते.
हेही वाचा –
IND VS NZ; टीम इंडियाच्या लाजिरवाण्या पराभवाने किवी संघाचा विजयाचा दुष्काळ संपला!
बंगळुरू कसोटीत टीम इंडियाचा पराभव का झाला? प्रमुख कारणं जाणून घ्या
न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवामुळे भारताची चिंता वाढली, WTC गुणतालिकेत टीम इंडियाला मोठा धक्का