भारतीय यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंत (Rishbh Pant) इंग्लंडविरुद्ध एजबेस्टनमध्ये दुसऱ्या कसोटी सामन्यात आणखी एक शतक ठोकून डॉन ब्रॅडमन, राहुल द्रविड़ आणि ब्रायन लारा यांच्यासारख्या दिग्गजांच्या यादीत सामील होऊ शकतो. पंतने पहिल्या लीड्स कसोटी सामन्यात 134 आणि 118 अशी दोन शानदार शतके झळकावली आहे. मात्र ती खेळी व्यर्थ गेली, कारण भारत 371 धावांचे लक्ष्य वाचवू शकला नाही आणि 5 विकेट्सने सामना संघाला गमवावा लागला.
रिषभ पंत इंग्लंडमध्ये आजपर्यंत खूप चांगल्या प्रकारे खेळला आहे. तिथे त्याने 10 कसोटी सामन्यातील 19 डावांत 42.52च्या सरासरीने 808 धावा केल्या आहेत. त्यात 4 शतकं आणि 2 अर्धशतकं समाविष्ट आहेत. त्याची सर्वोत्तम खेळी 146 धावांची आहे.
जुलै 2022 मध्ये जेव्हा तो शेवटच्या वेळेस एजबेस्टनमध्ये खेळला होता तेव्हा त्याने फक्त 111 चेंडूत 19 चौकार आणि 4 षटकारांसह 146 धावा ठोकल्या होत्या. रवींद्र (Ravindra Jadeja) जडेजासोबतच्या भागीदारीमुळे भारताने 98/5 अशा स्थितीतून सावरून 416 धावांपर्यंत मजल मारली होती. पण तरीही भारत सामना हरला कारण इंग्लंडने 378 धावांचे लक्ष्य पार केले.
आता जर पंतने एजबेस्टनमध्ये पुन्हा शतक ठोकले, तर इंग्लंडमध्ये सलग 3 कसोटी सामन्यात शतक झळकावणारा तो 7वा परदेशी फलंदाज ठरेल. या यादीत ब्रॅडमन, ऑस्ट्रेलियाचा वॉरेन बार्डस्ले, राहुल द्रविड़, ब्रायन लारा, चार्ल्स जॉर्ज मॅकार्टनी आणि न्यूझीलंडचा डॅरिल मिशेल यांचा समावेश आहे.
राहुल द्रविड़नंतर (Rahul Dravid) 23 वर्षांनंतर भारतासाठी ही कामगिरी करणारा रिषभ पंत फक्त दुसरा भारतीय खेळाडू असणार आहे. द्रविड यांनी त्या वेळी नॉटिंगहॅममध्ये 115, लीड्समध्ये 148 आणि ओव्हलमध्ये 217 धावा केल्या होत्या. ही कामगिरी करणारा सर्वात अलीकडचा परदेशी फलंदाज डॅरिल मिशेल आहे. त्याने लॉर्ड्समध्ये 108, नॉटिंगहॅममध्ये 190 आणि लीड्समध्ये 109 धावा केल्या होत्या.
दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या कठीण परिस्थितीत भारतीय यष्टीरक्षक फलंदाजांनी सर्वाधिक शतकं करणं आणि आशियाई यष्टीरक्षकांमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत पंतने एमएस धोनीला (Rishbh Pant) मागे टाकलं. तसेच, लीड्समध्ये एका कसोटी सामन्यात दोन शतके ठोकणारा तो पहिला भारतीय यष्टीरक्षक ठरला.