आजपासून(3 नोव्हेंबर) भारत आणि बांगलादेश संघात 3 सामन्यांच्या टी20 मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना आज दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरु होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत.
भारताचा नियमीत कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रोहित शर्मा या टी20 मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे.
आज होणाऱ्या टी20 सामन्याआधी काल प्रभारी कर्णधार रोहित पत्रकारपरिषदेसाठी उपस्थित होता. यावेळी त्याने अनेक गोष्टींवर भाष्य केले. यामध्ये भारतीय संघ रिषभ पंत आणि संजू सॅमसनपैकी कोणाला यष्टीरक्षक म्हणून पहिल्या सामन्यासाठी संधी देणार, यावरही तो बोलला.
रोहितने भारतीय संघात रिषभलाच पहिली पंसती मिळेल याचे संकेत दिले आहेत. तो म्हणाला, ‘आमच्या संघातील दोन्ही यष्टीरक्षक प्रतिभाशाली आहेत. आम्ही रिषभ पंतला पसंती देऊ, कारण क्रिकेटचा हा असा प्रकार आहे, ज्यामध्ये रिषभने त्याची एक वेगऴीच ओळख निर्माण केली आहे. त्याने या प्रकारात चांगली कामगिरी केली आहे.’
‘आम्ही पुढील काही काळासाठी पंतलाच पसंती देऊ आणि तो काय करतो ते पाहू. जर त्याचा दिवस असेल तर तो सामना कसा पुढे घेऊन जातो, हे आपण पाहिले आहे. फक्त आपण त्याला थोडा पाठिंबा द्यायला हवा.’
तसेच रोहित म्हणाला, ‘रिषभने केवळ 15-20 सामने खेळले आहेत. त्यामुळे तो चांगला आहे की वाईट हे ठरविणे घाईचे ठरेल.’
त्याचबरोबर रोहितने संजू सॅमसन किंवा शिवम दुबे पैकी एकाला पहिल्या टी20 सामन्यासाठी 11 जणांच्या संघात नक्कीच संधी मिळेल असेही सांगितले.





