रिषभ पंतच्या नेतृत्त्वाखालील दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध झालेला आयपीएल २०२२मधील ५५वा सामना ९१ धावांनी गमावला. सलामीवीर डेवॉन कॉनवेच्या ८७ धावांच्या खेळीच्या जोरावर चेन्नईने २०८ धावा फलकावर लावल्या. प्रत्युत्तरात दिल्लीचा डाव १७.४ षटकांमध्ये ११७ धावांवरच गडगडला. या लाजिरवाण्या पराभवानंतर दिल्लीचा संघ १० गुणांसह गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर कायम आहे. आता त्यांना प्लेऑफचे तिकीट मिळवण्यासाठी उर्वरित तिन्ही सामने जिंकावे लागणार आहेत. दिल्ली संघाचा कर्णधार पंतने या मोठ्या पराभवानंतर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
दिल्ली संघातील (Delhi Capitals) सदस्य कोरोना (Covid-19) तसेच फ्लू आजाराने ग्रस्त आहेत. तरीही आम्ही या गोष्टीला सबब न बनवता खेळण्याचा प्रयत्न करत असल्याचे पंतने म्हटले आहे.
सामन्यानंतर पंत (Rishabh Pant) म्हणाला की, “चेन्नई संघाने प्रत्येक विभागात आमच्यावर वर्चस्व गाजवले. या दारुण पराभवानंतर आम्ही पुढील ३ सामन्यांवर अधिक लक्ष केंद्रित करत आहोत. जर आम्ही हे तिन्ही सामने जिंकले, तर आम्ही प्लेऑफसाठी पात्र बनू. आमच्या संघातील सदस्य कोरोना तसेच फ्लू आजाराशी झुंज देत आहेत. परंतु आम्ही याला सबब म्हणून वापरत नाहीय. आम्ही आता फक्त शक्य तितके सकारात्मक राहून गोष्टी करण्याचा प्रयत्न करू शकतो.”
दरम्यान सामन्याबाबत बोलायचे झाल्यास, सीएसके (Chennai Super Kings) संघाने निर्धारित २० षटकात ६ विकेट्स गमावत २०८ धावा केल्या आणि दिल्लीपुढे २०९ धावांचा डोंगर उभा केला. सीएसकेकडून सलामीवीर डेवॉन कॉन्वे याने सर्वाधिक ८७ धावा फटकावल्या. केवळ ४९ चेंडू खेळताना ५ षटकार आणि ७ चौकारांच्या मदतीने त्याने ही शानदार खेळी केली. त्याच्याबरोबरच सलामीवीर ऋतुराज गायकवाड यानेही ४१ धावांचे योगदान दिले. तसेच एमएस धोनीनेही ८ चेंडूत २१ धावा जोडल्या.
या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्ली संघाला फक्त ११७ धावाच करता आल्या आणि १७.४ षटकात दिल्लीचा संघ सर्वबाद झाला. दिल्लीकडून मिचेल मार्शने सर्वाधिक २५ धावा केल्या. तसेच शार्दुल ठाकूरने २४ आणि कर्णधार रिषभ पंतने २१ धावा केल्या. या डावात चेन्नईकडून मोईन अलीने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच मुकेश चौधरी, सिमरजीत सिंग आणि ड्वेन ब्रावो यांनीही प्रत्येकी २ फलंदाजांना बाद केले. त्यामुळे चेन्नईने हा सामना ९१ धावांनी जिंकला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
ऋतुराजने विरोधी संघाच्या वेगवान गोलंदाजाचे गायले गोडवे; वाचून तुम्हीही म्हणाल, ‘क्या बात है’