आयपीएल २०२१ स्पर्धेतील पहिल्या क्वालिफायरच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन्ही संघ आमने सामने होते. आयपीएल २०२१ स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यासाठी दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. शेवटी एमएस धोनीने विजयी चौकार मारत संघाला विजयी केले आणि अंतिम सामन्यात प्रवेश मिळवून दिला. आता दिल्ली कॅपिटल्स संघाला अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी आणखी एका सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. त्यामुळे पराभूत झाल्यानंतर रिषभ पंत भावूक झाल्याचे पाहायला मिळाले होते.
रिषभ पंतने सामना झाल्यानंतर म्हटले की, “हे खूप निराशाजनक आहे. यावेळी आम्हाला काय वाटतंय हे आम्ही शब्दात व्यक्त करू शकत नाही. यावेळी आम्ही एकच गोष्ट करू शकतो, ती म्हणजे झालेल्या चुका विसरून येणाऱ्या सामन्यावर लक्ष केंद्रित करणे. मला वाटले की टॉम करणने संपूर्ण सामन्यात चांगली गोलंदाजी केली, पण दुर्दैवाने त्याने शेवटच्या षटकात धावा खर्च केल्या. माझ्या मते, आम्ही दिलेले आव्हान हे पुरेसे होते.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “पावरप्लेमध्ये आम्ही खूप जास्त धावा खर्च केल्या आणि एकही गडी बाद करता आला नाही. ज्याचा या सामन्यावर परिणाम झाला. एक क्रिकेटपटू म्हणून आम्ही आमच्या चुकांमध्ये सुधार करू. या सामन्यातील चुकांमधून आम्ही शिकून पुढील सामन्यात आम्ही विजय मिळवू अशी आशा करतो.”
या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघाकडून पृथ्वी शॉने तुफानी ६० धावांची खेळी केली. तर कर्णधार रिषभ पंतने नाबाद ५१ धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्स संघाला २० षटक अखेर ६ बाद १७२ धावा करण्यात यश आले होते.
या धावांचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्स संघाकडून ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक ७० धावांची खेळी केली. तर रॉबिन उथप्पाने ६३ धावांचे योगदान दिले. तर शेवटी एमएस धोनीने जोरदार आक्रमण केले. त्याने नाबाद १८ धावांची खेळी करत चेन्नई सुपर किंग्ज संघाला ४ गडी राखून विजय मिळवून दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
एलिमिनेटर सामन्यापूर्वी ‘या’ अष्टपैलूने सोडली आरसीबीची साथ, मोठ्या कारणामुळे परतला मायदेशी
आज ‘पर्पल पटेल’ करणार आयपीएलमधील सर्वात मोठा विक्रम आपल्या नावे?