सध्या खेळल्या जात असलेल्या दुलिप ट्रॉफीमध्ये (Duleep Trophy) भारतीय यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने (Rishabh Pant) टी20 प्रमाणे फलंदाजी करताना शानदार अर्धशतक झळकावले. पंत या स्पर्धेत भारत ‘ब’ संघाकडून खेळत आहे. या सामन्याच्या पहिल्या डावात पंत लवकर बाद झाला होता. मात्र, दुसऱ्या डावात त्याने आश्चर्यकारक कामगिरी करत वेगाने धावा केल्या. या खेळी दरम्यान पंतची तीच जुनी शैली दिसली ज्यासाठी तो ओळखला जातो.
पहिल्या डावात 10 चेंडूत 07 धावा केल्यानंतर बाद झालेल्या पंतने 47 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 61 धावा केल्या. यादरम्यान या यष्टीरक्षक फलंदाजाने अवघ्या 34 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. अनेकदा टी20 क्रिकेटमध्ये फलंदाज इतक्या चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण करतात. परंतु पंतने हे कसोटी प्रारूपात खेळल्या जाणाऱ्या दुलिप ट्रॉफीमध्ये केले.
पंत कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये अनेक वेळा वेगवान खेळ्या खेळल्या आहेत. आता दुलिप ट्रॉफीमध्येही पंतची हीच शैली पाहायला मिळाली. 19 सप्टेंबरपासून बांगलादेशविरुद्धच्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी पंतचा हा फॉर्म टीम इंडियासाठी चांगली बातमी आहे.
पंतने टीम इंडियासाठी शेवटची कसोटी डिसेंबर 2022 मध्ये बांगलादेशविरुद्ध खेळली होती. यानंतर कार अपघातात पंत गंभीर जखमी झाला. पंतने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये पुनरागमन केले असले तरी, त्याचे कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन होणे बाकी आहे. 2018 मध्ये भारताकडून कसोटी पदार्पण करणाऱ्या पंतने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत 33 कसोटी सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या 56 डावांमध्ये त्याने 43.67 च्या सरासरीने 2271 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 5 शतके आणि 11 अर्धशतके सामील आहेत. ज्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 159 धावा आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
Duleep Trophy: भारताच्या ‘या’ स्टार फिरकीपटूची खतरनाक गोलंदाजी, घेतल्या 7 विकेट्स
“तेंडुलकरने अख्तरला खतरनाक…” 2003च्या विश्वचषकाची आठवण करून देत ‘या’ दिग्गजाचे मोठे वक्तव्य
Duleep Trophy: रुतुराज गायकवाडच्या संघाची शानदार विजयाने सुरुवात!