मुंबई। शुक्रवारी (२२ एप्रिल) इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामामध्ये झालेल्या ३४ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने दिल्ली कॅपिटल्सला १५ धावांनी पराभवाचा धक्का दिला. मात्र, वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यातील खेळाडूंच्या कामगिरीपेक्षा अखेरच्या षटकात रंगलेल्या नोबॉलच्या नाट्याची अधिक चर्चा झाली. पण, आता या घटनेमुळे दिल्लीचा कर्णधार रिषभ पंत, गोलंदाज शार्दुल ठाकूर आणि फलंदाजी प्रशिक्षक प्रविण आमरे यांच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे.
आयपीएलच्या प्रसिद्धीपत्रकात याबद्दल माहिती देण्यात आली आहे. त्यात लिहिले आहे की, दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंतला आयपीएलच्या आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी सामना शुल्काच्या १०० टक्के दंड झाला आहे. पंतवर आयपीएलच्या आचारसंहितेच्या कलम २.७ अंतर्गत लेव्हल २ चा गुन्हा केल्याचा आरोप झाला आहे. त्याने हा आरोप मान्य केला असून शिक्षाही मान्य केली आहे.
तसेच शार्दुल ठाकूर याला देखील आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी सामनाशुल्काच्या ५० टक्के दंड आकारण्यात आला आहे. त्याच्यावर आयपीएलच्या आचारसंहितेच्या कलम २.८ अंतर्गत लेव्हल २ चा आरोप लावण्यात आला होता, जो त्याने मान्य केला आहे (Rishabh Pant, Shardul Thakur And Pravin Amre Fined For IPL Code Of Conduct Breach.)
त्याचबरोबर दिल्ली कॅपिटल्सचे प्रशिक्षक प्रविण आमरे यांच्यावरही मोठी कारवाई झाली आहे. त्यांच्यावर आयपीएलच्या आचारसंहितेच्या कलम २.२ अंतर्गत लेव्हल २ चा आरोप लावण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना सामना शुल्काच्या १०० टक्के दंड झाला असून त्यांच्यावर एका सामन्याची बंदी देखील घालण्यात आली आहे. आमरे यांनी हा गुन्हा मान्य केला असून कारवाईही मान्य केली आहे.
नक्की झालं काय?
शुक्रवारी झालेल्या सामन्यांत राजस्थानने दिल्लीसमोर २२३ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्ली संघाला ३६ धावांची गरज होती. यावेळी दिल्लीकडून कुलदीप यादव आणि रोवमन पॉवेल फलंदाजी करत होते. राजस्थानकडून ओबेड मॅकॉय गोलंदाजी करत होता. त्याने या टाकलेल्या या षटकातील पहिल्या तिन्ही चेंडूवर पॉवेलने षटकार ठोकत रोमांच वाढवला होता.
पण, याचवेळी या षटकातील तिसरा चेंडू मॅकॉयने फुलटॉस टाकला होता, तो नो बॉल असल्याची विचारणा पंचांना फलंदाजाकडून करण्यात आली. पण नो बॉल मैदानावरील पंचांकडून देण्यात आला नाही. यावर दिल्ली कॅपिटल्स संघाकडून निराशा व्यक्त करण्यात आली. दरम्यान दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंतने तर फलंदाजांना परत येण्याचा इशाराही केला होता. त्यावेळी शार्दुल ठाकूरही त्याला साथ देताना दिसला होता. पण नंतर त्याची फलंदाजी प्रशिक्षक प्रविण आमरे आणि सहाय्यक प्रशिक्षक शेन वॉटसनने समजूत काढली.
मात्र, यावेळी प्रविण आमरे मैदानातही गेले होते, त्यांनी पंचांशी चर्चा देखील केली. त्यानंतर उर्वरित खेळ पूर्ण करण्यात आला. नंतर, पॉवेल अखेरच्या चेंडूवर बाद झाला. शेवटच्या तीन चेंडूत दिल्लीकडून २ धावाच झाल्या, परिणामी दिल्लीला १५ धावांनी पराभव स्विकारावा लागला (no ball controversy).
https://twitter.com/Twinkle_Agrawl/status/1517692446896918528
या सामन्यात जोस बटलरच्या ११६ धावांच्या शतकी खेळीच्या जोरावर राजस्थानने २० षटकांत २ बाद २२२ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना दिल्लीने २० षटकांत ८ बाद २०७ धावा केल्या.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022| शतक केलं बटलरने आणि निशाण्यावर आला विराट, मीम्स सोशल मीडियावर व्हायरल
‘नक्कीच ते बरोबर नव्हते’, पंतने मान्य केली चूक, तर नो बॉल वादाबद्दल सॅमसन म्हणाला…