विंडिज विरुद्ध 4 आॅक्टोबरपासून सुरु होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी रिषभ पंत या एकमेव यष्टीरक्षकाला 15 जणांच्या भारतीय संघात संधी मिळाली आहे.
त्याने नुकतेच इंग्लंड विरुद्ध पार पडलेल्या 5 सामन्यांच्या कसोटी सामन्यात शेवटच्या तीन सामन्यात यष्टीरक्षण केले होते. पण त्याने या तीन सामन्यात 76 बाइज दिल्याने त्याच्या यष्टीरक्षणाच्या शैलीवर टिका झाली होती.
त्यामुळे त्याने इंग्लंड दौऱ्यावरुन परतल्यावर तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (एनसीए) त्याच्या यष्टीरक्षणावर कष्ट करणार असल्याचे सांगितले होते.
यामुळे बीसीसीआयही त्याला यासाठी मदत करत आहे. टाइम्स आॅफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या विनंतीनुसार बीसीसीआयचे सरव्यवस्थापक साबा करिम यांनी भारताचे माजी यष्टीरक्षक फलंदाज किरण मोरे यांना रिषभला मार्गदर्शन करण्यास सुचवले होते.
बीसीसीआयच्या सुत्रांनी सांगितले की ‘मोरे हे एनसीएमध्ये मागील 3 वर्षांपासून काम करत आहेत. खासकरुन 16, 19 आणि 23 वर्षांखालील अशा विविध वयोगटातील संघांबरोबर काम करत आहे. तसेच मोरे यांनी संजू सॅमसन आणि इशान किशन सारख्या यष्टीरक्षकांबरोबरही काम केले आहे.’
याबद्दल मोरे यांनी सांगितले की त्यांनी तीन दिवस एनसीएमध्ये रिषभला विंडिज विरुद्ध होणाऱ्या मालिकेच्या तयारीसाठी मार्गदर्शन दिले आहे. पण बीसीसीआयशी चालू असलेल्या एका कराराच्या आधी यावर त्यांनी आणखी काही सांगण्यास नकार दिला.
एनसीएमधील एका सुत्राने सांगितले की ‘पंतने याआधी एनसीएमध्ये अनेक कॅम्प केले आहेत. पण समस्या अशी आहे की त्याच्या प्रगतीचा नंतर पाठपुरावा करणे अवघड होते. त्यांनी छोट्या छोट्या तांत्रिक गोष्टींवर काम केले. जसे की, तोल, डोक्याचे स्थान आणि लेग साइडच्या हालचाली.’
‘खूप गोष्टींवर तीन दिवसात काम करणे अवघड असते. असे असले तरी मोरे यांनी या छोट्या कालावधीत त्यांना शक्य असलेल्या गोष्टी केल्या. एखाद्याची यष्टीरक्षणाची शैली सुधारणे ही मोठी प्रक्रिया आहे. पण रिषभचा प्रतिसाद खूप चांगला होता.’
किरण मोरे हे भारताकडून 49 कसोटी आणि 94 वनडे खेळले असून त्यांनी कसोटीत यष्टीमागे 130 विकेट्स घेतल्या असून यात त्यांनी 110 झेल आणि 20 यष्टीचीत केले आहेत.
तसेच भारताकडून कसोटीत यष्टीमागे सर्वाधिक विकेट घेणाऱ्या यष्टीरक्षकांमध्ये ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
याबरोबरच त्यांनी वनडेत यष्टीमागे 90 विकेट्स घेतल्या आहेत. यात 63 झेल आणि 27 यष्टीचीत विकेट्सचा सामावेश आहे. वनडेतही ते भारताकडून यष्टीमागे सर्वाधिक विकेट घेणारे तिसऱ्या क्रमांकाचे यष्टीरक्षक आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
–राजकोट कसोटीपुर्वी विंडीजला मोठा धक्का, तब्बल ४८ कसोटी खेळलेला खेळाडू संघाबाहेर
–टीम इंडियात पुन्हा स्थान मिळविण्यासाठी धडपडणाऱ्या युवराजचे शतक हुकले
–…म्हणून करुण नायर म्हणतो; तरी झाली कुठं चूक, माझी मला कळंना!!!