इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) चौदाव्या हंगामात रिषभ पंतच्या नेतृत्वातील दिल्ली कॅपिटल्स संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. भारतात झालेल्या स्पर्धेतील पूर्वार्धात संघाने शानदार कामगिरी केली होती. तीच कामगिरीपुढे कायम ठेवत युएईमध्ये देखील त्यांनी अप्रतिम प्रदर्शन केले. दिल्लीच्या या यशाचे कौतुक करताना ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू शेन वॉटसन याने महत्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे.
पंत खूप भाग्यशाली आहे
ऑस्ट्रेलियाचा तसेच आयपीएलच्या इतिहासातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक असलेला शेन वॉटसन सध्या आयपीएलमध्ये समीक्षकाची भूमिका पार पाडत आहे. प्रसारण वाहिनीशी बोलताना त्याने दिल्ली कॅपिटल्स व रिषभ पंतचे कौतुक केले. तो म्हणाला,
“रिषभ पंत खूप भाग्यशाली आहे कारण त्याला रिकी पॉंटिंग प्रशिक्षक म्हणून लाभलाय. रिकी हा जगातील सर्वोत्तम कर्णधार तसेच क्रिकेटचे अफाट ज्ञान असलेला खेळाडू आहे. मी त्याच्या नेतृत्वात खेळलो आहे आणि तो शानदार अनुभव होता. रिकी वेळोवेळी मार्गदर्शन करत असतो, ज्यामुळे आपण चांगली कामगिरी करू शकतो. रिषभला जेव्हा संघाचे नेतृत्व दिले गेले तेव्हा माझ्या मनात काहीशी शंका होती. मात्र, त्याने मला खोटे ठरवत जबरदस्त कामगिरी करून दाखवली. संपूर्ण संगीत सध्या शानदार कामगिरी करतोय.”
खूप आधीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या वॉटसन याने मागील वर्षी आयपीएलमधून देखील निवृत्ती स्वीकारली होती. तोच दोन वेळा स्पर्धेचा मानकरी राहिला होता.
दिल्ली गुणतालिकेत प्रथम
आयपीएल २०२१ च्या पूर्वीच नियमित कर्णधार श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त झाल्याने दिल्ली संघ व्यवस्थापनाने कर्णधार म्हणून रिषभची निवड केली होती. त्याच्या नेतृत्वात दिल्लीने मागील वर्षी सारखीच कामगिरी करत, प्ले ऑफसाठी पात्रता मिळवली आहे. संघाने आत्तापर्यंत १३ सामन्यात ९ विजय मिळवले असून ते गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहेत. सलामीवीर शिखर धवन, श्रेयस अय्यर व शिमरॉन हेटमायर हे फलंदाज तर, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, कगिसो रबाडा, आवेश खान व एन्रिक नॉर्किए हे गोलंदाज फॉर्ममध्ये आहेत.