भारतीय क्रिकेट संघाने चार सामन्यांची बॉर्डर- गावसकर ट्रॉफी सीरिज जिंकत सलग दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन भूमीत कसोटी मालिका विजयाची पताका झळकावली. यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याने माफक खेळी करत संघाच्या विजयात महत्त्वपुर्ण योगदान दिले. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा केल्या. तरीही त्याला एका गोष्ट न केल्याची खंत वाटत असल्याचे एका मुलाखतीत त्याने सांगितले आहे.
काय होता गेम प्लॅन?
ब्रिस्बेन कसोटीतील दुसऱ्या डावात भारतीय संघ ३२८ धावांचे आव्हान डोळ्यांपुढे ठेवून मैदानावर उतरला होता. सलामीवीर शुबमन गिल याने ९१ धावांची आतिशी खेळी करत संघाला दमदार सुरुवात करून दिली होती. गिलनंतर चेतेश्वर पुजाराने अर्धशतकी खेळी करत संघाचा डाव सावरला होता. परंतु पुजारा बाद झाल्यानंतर सर्व जबाबदारी पंतच्या खांद्यावर आली होती. अशात पंतने वॉशिंग्टन सुंदरसोबत मिळून संघाला विजय मिळवून देण्याचे ठरवले होते.
पंत सुंदरसोबत केलेली भागिदारी आणि त्यांचा गेम प्लॅन सांगताना म्हणाला की, “मी सुंदरला मला सहकार्य करण्यास सांगितले होते. जेणेकरून मी चौकार-षटकार मारत अधिकाधिक धावा केल्या असत्या. परंतु सुंदरला मोठे शॉट खेळायचे होते. त्यामुळे त्याने माझ्याकडे तसा हट्ट केला. त्यानंतर आम्ही दोघांनी काही वेळ शांतपणे विचार करून अंतिम निर्णय घेतला. मी सुंदरला सहकार्य करण्याचे ठरवले. त्यामुळे माझी फटकेबाजी करत संघाला विजय मिळवून देण्याची इच्छा अपूर्ण राहिली. मला याच गोष्टीची खंत वाटत आहे.”
सिडनी कसोटी जिंकून दिली असती- रिषभ पंत
याबरोबरच सिडनी कसोटीत पंतने १२ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ९७ धावांची तूफानी खेळी केली होती. मात्र सामन्याच्या अंतिम टप्प्यात ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लायनने पॅट कमिन्सच्या हातून त्याला झेलबाद केले होते. पुढे आर अश्विन आणि हनुमा विहारी यांनी संथपणे फलंदाजी करत सामना अनिर्णीत राखला होता.
याविषयी बोलताना पंत म्हणाला की, “मी सिडनी कसोटीच्या अखेरच्या दिवशी ९७ धावांवर बाद झालो होतो. परंतु जर मी अजून थोडावेळ फलंदाजी केली असती; तर नक्कीच मी संघाला सामना जिंकून दिला असता. मला फलंदाजी करताना दुखापतीमुळे वेदना झाल्यास अजून २ इंजेक्शन घ्यावे लागले असते; तरीही मला फरक पडला नसता. कारण मी त्यावेळी वेगळ्याच मनस्थितीत होतो. त्यावेळी मला माझ्या हाती आलेल्या संधीला वाया जाऊ द्यायचे नव्हते.”
“असे असले तरी, शेवटी आम्ही कसोटी मालिका जिंकली याचा मला आनंद आहे. कधीही पराभूत होण्यापेक्षा विजय मिळवणे हा सर्वोत्तम पर्याय असतो. त्यामुळे एका सामन्याला न पाहता शेवटी मालिका जिंकणे आणि दौऱ्याला अविस्मरणीय बनवणे, हाच माझा हेतू होता. माझ्या संघाला विजय मिळवून देणे, यापेक्षा दुसरी कोणतीही गोष्ट मोठी नाही”, असे शेवटी पंतने सांगितले.
पंतने कसोटी मालिकेत केल्या सर्वाधिक धावा
रिषभ पंतला ऍडलेड येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नव्हती. मात्र अखेरच्या ३ सामन्यातील ५ डावात फलंदाजी करताना ६८.५० च्या सरासरीने त्याने २७४ धावा केल्या होत्या. यासह पंत ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा पहिला फलंदाज ठरला.
महत्त्वाच्या बातम्या-
वाढदिवस विशेष: टीम इंडियाची माॅडर्न एराची भिंत, चेतेश्वर पुजारा!
घरी पैसे नसल्याने आईने स्वत: शिवले होते पुजारासाठी बॅटिंग पॅड, त्यागाची कहाणी आहे अतिशय भावनिक
शॉन पोलॉकबरोबर ४ वर्षांच्या मार्नस लॅब्यूशेनच्या ‘त्या’ फोटोमागील एक मनोरंजक कथा, घ्या जाणून