(9 मे) रोजी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) जाहीर केले होते की पाकिस्तान सुपर लीग (PSL 2025) स्पर्धेचे उर्वरित सामने पाकिस्तानबाहेर होतील. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान, परदेशी खेळाडूंना शक्य तितक्या लवकर त्यांच्या देशात परत पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली होती. खरे तर, खेळाडू यूएईमार्गे आपापल्या देशात पोहोचले आहेत. आता बांगलादेशी क्रिकेटपटू रिशाद हुसेनने (Rishad Hossain) दुबईमध्ये पोहोचताच खेळाडूंनी कसा सुटकेचा नि:श्वास सोडला आहे हे उघड केले आहे.
क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, दुबई विमानतळावर पत्रकारांशी बोलताना रिशाद हुसेन म्हणाला, “ही देवाची कृपा आहे, आम्ही एका भयानक संकटावर मात केली आहे आणि दुबईला पोहोचलो आहोत आणि मला आता बरे वाटत आहे.”
पुढे बोलताना रिशाद हुसेन म्हणाला की, जेव्हा पाकिस्तानमधील विमानतळ सोडला तेव्हा अवघ्या 20 मिनिटांनी विमानतळाचे तुकडे-तुकडे झाले. तो म्हणाला, “ही बातमी भयानक आणि वेदनादायक देखील आहे. आता दुबईला पोहोचल्यानंतर आम्हाला दुसरे जीवन मिळाल्यासारखे वाटते.”
रिशाद हुसेनने सांगितले की, त्यांचा सहकारी क्रिकेटपटू नाहिद राणा थरथर कापू लागला. तो म्हणाला, “नाहिद राणा खूप शांत होता, कदाचित तो तणावात होता. मी त्याला सतत ताण घेऊ नको आणि आपल्याला काहीही होणार नाही अशी आशा बाळगण्यास सांगितले होते.”
या बांगलादेशी क्रिकेटपटूने त्याच्या विधानात आणखी एक मोठा खुलासा केला आणि सांगितले की, जेव्हा इंग्लंडचा खेळाडू टॉम करनला (Tom Curran) पाकिस्तानमधील विमानतळ बंद असल्याचे कळले तेव्हा तो रडू लागला. पीसीबी अध्यक्षांना प्रथम कराचीमध्ये उर्वरित सर्व सामने करायचे होते, परंतु जेव्हा खेळाडूंनी सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले तेव्हा मोहसिन नक्वी यांच्यासोबत खेळाडूंची बैठक झाली, त्यानंतर सामना दुबईमध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु युएईनेही सामने आयोजित करण्याची मागणी फेटाळून लावली आहे.






