भारताचा मर्यादीत षटकांचा क्रिकेट संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर गेला आहे. तिथे त्यांना श्रीलंकेविरुद्ध ३ वनडे आणि ३ टी२० सामन्यांची मालिका खेळायची आहे. या दौऱ्याला १३ जुलैपासून सुरुवात होणार आहे. भारताचा नियमित कर्णधार विराट कोहली आणि वनडे, टी२० संघाचा उपकर्णधार रोहित शर्मासह अनेक अनुभवी खेळाडू सध्या भारताच्या कसोटी संघासह इंग्लंड दौऱ्यावर आहेत. त्यामुळे श्रीलंका दौऱ्यासाठी निवड करण्यात आलेल्या संघात अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. तसेच या संघाचे कर्णधारपद शिखर धवनच्या तर उपकर्णधारपद भुवनेश्वर कुमारच्या हाती सोपवण्यात आले आहे.
या श्रीलंका दौऱ्याच्या निमित्ताने आपण एका खास विक्रमावर नजर टाकू जो विक्रम गेले २ दशके अबाधित आहे. हा विक्रम म्हणजे भारत-श्रीलंका यांच्यातील वनडे सामन्यांमध्ये २ वेळा ५ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याची कामगिरी. आत्तापर्यंत असा विक्रम फक्त भारताचा माजी क्रिकेटपटू रॉबिन सिंगलाच करता आला आहे. त्याच्याव्यतिरिक्त आत्तापर्यंत भारताच्या किंवा श्रीलंकेच्या खेळाडूंना असा पराक्रम करता आलेला नाही.
दोन दशकापूर्वी रॉबिन सिंगने केला होता पराक्रम
रॉबिन सिंगने श्रीलंकेविरुद्ध वनडेत पहिल्यांदा ५ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याची कामगिरी गुवाहाटीमध्ये १९९७ साली केली होती. त्या सामन्यात त्याने २२ धावा देत ५ विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर त्याने दुसऱ्यांदा १९९९ सालच्या विश्वचषकात असा कारनामा केला. त्याने टॉन्टन येथे झालेल्या भारत विरुद्ध श्रीलंका सामन्यात ३१ धावा देत ५ विकेट्स घेतल्या होत्या. याबरोबर तो भारत-श्रीलंका वनडे सामन्यांत २ वेळा ५ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणारा पहिला आणि एकमेव गोलंदाज ठरला होता. त्याच्यानंतर गेल्या दोन दशकात हा पराक्रम कोणालाही करता आलेला नाही.
भुवनेश्वरला रॉबिन सिंगचा विक्रम मोडण्याची संधी
रॉबिन सिंगचा २ वेळा ५ विकेट्स घेण्याचा दोन दशकांपासून अबाधिक असलेला हा विक्रम मोडण्याची संधी भुवनेश्वर कुमारकडे आहे. भुवनेश्वरने यापूर्वी २०१७ साली कोलंबो येथे ४२ धावा देत ५ विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे श्रीलंकेविरुद्धच्या आगामी वनडे मालिकेत त्याच्याकडे दुसऱ्यांदा श्रीलंकेविरुद्ध ५ विकेट्स घेण्याची संधी असणार आहे. विशेष म्हणजे आगमी श्रीलंका विरुद्ध भारत यांच्यातील वनडे मालिका कोलंबो येथेच होणार आहे.
असा असणार आहे श्रीलंका दौरा
श्रीलंका दौऱ्यात भारतीय संघ ३ टी२० सामन्यांची आणि ३ वनडे सामन्यांची मालिका खेळवणार आहे. हा दौरा १३ ते २५ जुलै दरम्यान होईल. आधी वनडे मालिका खेळवली जाईल. त्यानंतर टी२० मालिका होईल. वनडे मालिकेतील सामने अनुक्रमे १३, १६ आणि १८ जुलै रोजी होतील; तर टी२० मालिकेतील सामने २१, २३ आणि २५ जुलै रोजी होतील. हे सर्व सामने कोलंबो येथे होणार आहेत.
श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ- शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शाॅ, देवदत्त पड्डिकल, ऋतुराज गायकवाड, सुर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नितीश राणा, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), राहुल चाहर, के गाॅथम, कृणाल पंड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, भुनवेश्वर कुमार (उपकर्णधार) दिपक चाहर, नवदीप सैनी, चेतन सकरिया, युजवेंद्र चहल.
नेट गोलंदाज – इशान पोरेल, संदीप वॉरियर, अर्शदीप सिंग, साई किशोर आणि सिमरजीत सिंग
महत्त्वाच्या बातम्या –
मिताली राजची एकाकी झुंज पुन्हा अपयशी; इंग्लंड महिलांनी दुसऱ्या वनडेतील विजयासह मालिकाही टाकली खिशात