दुबई। एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्स संघाने इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. चेन्नईने रविवारी दिल्ली कॅपिटल्स संघाला क्वालिफायर १ च्या सामन्यात ४ विकेट्सने पराभूत केले. चेन्नईच्या या विजयात अनुभवी फलंदाज रॉबिन उथप्पाने मोलाचा वाटा उचलला. विशेष म्हणजे रविवारी त्याच्या मुलाचा वाढदिवसही होता.
ऋतुराज-उथप्पाचे मोलाचे योगदान
या सामन्यात दिल्लीने चेन्नईसमोर १७३ धावांचे आव्हान ठेवले होते. पण चेन्नईने फाफ डू प्लेसिसची विकेट लवकर गमावली. पण त्यानंतर ऋतुराज गायकवाड आणि रॉबिन उथप्पाने डाव सांभाळत चेन्नईला भक्कम स्थितीत उभे केले. या दोघांनी ११० धावांची भागीदारी करताना वैयक्तिक अर्धशतकंही केली.
उथप्पाने ४४ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकारांसह ६३ धावा केल्या. तर, ऋतुराजने ५० चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांसह ७० धावांची खेळी केली. अखेर मोईन अलीने १६ आणि धोनीने ६ चेंडूत ३ चौकार आणि १ षटकारासह १८ धावांचे योगदान देत चेन्नईच्या विजयावर शिक्कामोबर्तब केले.
अर्धशतक मुलाला समर्पित
उथप्पाचा मुलगा नील नोलनने रविवारी त्याचा चौथा वाढदिवस साजरा केला. विशेष म्हणजे त्याच्या वाढदिवसाचे त्याला त्याच्या बाबाकडून खास गिफ्टही मिळाले. उथप्पाने या सामन्यात केलेली खेळी त्याच्या ४ वर्षीय मुलाला समर्पित केली.
तो सामन्यानंतर म्हणाला, ‘संघासाठी योगदान दिल्याने आनंदीत आहे. आज माझ्या मुलाचा चौथा वाढदिवस असून ही खेळी त्याच्यासाठी होती. मी जेव्हा फलंदाजीसाठी गेलो तेव्हा मला माहित होते की आम्हाला चांगल्या सुरुवातीची गरज आहे, त्यामुळे मी फक्त येणाऱ्या चेंडूंवर योग्य ती प्रतिक्रिया द्यायचा प्रयत्न केला आणि मी त्याचप्रमाणे खेळलो.’
सामन्यानंतर मुलाची गळाभेट
सामना संपल्यानंतर अन्य खेळाडूंप्रमाणे उथप्पाही आपली पत्नी शितल आणि मुलगा नील नोलनला भेटला. त्याने या दोघांना मिठी मारली आणि सामना जिंकल्याचा आनंद व्यक्त केला. या क्षणाचा व्हिडिओ चेन्नई सुपर किंग्सने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
tHE RObin meets b'day boy Spidey! 💛#DCvCSK #WhistlePodu #Yellove 🦁 @robbieuthappa pic.twitter.com/jFfPkkNiHI
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) October 10, 2021
पंत, शॉची अर्धशतकं
या सामन्यात चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे दिल्लीने प्रथम फलंदाजी केली. दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ५ बाद १७२ धावा केल्या होत्या. दिल्लीकडून पृथ्वी शॉ आणि रिषभ पंतने अर्धशतकं केली. पंतबरोबर शिमरॉन हेटमायरने केलेली ८३ धावांची भागीदारीही महत्त्वाची ठरली.
शॉने ३४ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकारांसह ६० धावा केल्या. तसेच पंतने ३५ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांसह ५१ धावा केल्या. तर हेटमायरने ३७ धावा केल्या. चेन्नईकडून जोश हेजलवूडने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
डीजे ब्रावोचा भीमपराक्रम! ठरला टी२० क्रिकेटमध्ये ‘अशी’ कामगिरी करणारा पहिलाच गोलंदाज
विजय एक विक्रम अनेक! दिल्लीवरील विजयानंतर धोनीच्या नावावर ‘या’ विक्रमांची नोंद