भारतीय क्रिकेटमध्ये मंगळवारी (18 ऑक्टोबर) मोठा निर्णय घेण्यात आला. या दिवशी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) नवे अध्यक्ष जाहीर करण्यात आले. भारताचे माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी यांना बीसीसीआयचे 40वे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच एखाद्या माजी विश्वविजेत्या खेळाडूची बीसीसीआयचे पूर्णवेळ अध्यक्ष म्हणून वर्णी लागली आहे. आता हे पद क्रिकेटशी संबधित असताना क्रिकेटपटूच महत्वाचे पद सांभाळेल अशी अपेक्षा असते, मात्र तसे काही नाही. या लेखामध्ये आपण कोणते आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू बीसीसीआयचे अध्यक्ष झाले आहेत, हे जाणून घेऊ.
बीसीसीआयचे सर्वप्रथम अध्यक्ष आर.ई. ग्रांट गोवन हे होते. ते व्यावसायिक होते. ते गोव्हन ब्रोसचे व्यवस्थापकीय संचालक होते. त्यांनी 1928 ते 1933 यादरम्यान हे पद सांभाळले. भारतीय क्रिकेटसाठी महत्वाच्या या पदाला आतापर्यंत केवळ पाचच क्रिकेटपटू लाभले आहेत. रॉजर बिन्नी (Roger Binny) आणि सौरव गांगुली यांच्याशिवाय महाराज कुमार विजयनगरम, शिवलाल यादव (Shivlal Yadav) आणि सुनील गावसकर या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूनींही बीसीसीआयचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली आहे.
विजयनगरम हे 1954 ते 1956 या कालखंडादरम्यान बीसीसीआयचे अध्यक्ष राहिले होते. त्यांनी भारताकडून तीन कसोटी सामने खेळले. तसेच यादव आणि गावसकर यांनी 2014मध्ये काही कालावधीसाठी हे पद सांभाळले होते. शिवलाल यांनी भारताकडून 35 कसोटी आणि 7 वनडे सामने खेळले. गावसकर यांची आंतरराष्ट्रीय कारकिर्द तर एकदम उत्तम राहिली आहे. त्यांनी भारताकडून 125 कसोटी सामन्यात 10122 धावा आणि 108 वनडेमध्ये 3092 धावा केल्या आहेत.
विजयनगरम, यादव आणि गांगुली यांनी त्यांच्या कारकिर्दीत एकदाही विश्वचषक जिंकला नाही. तसेच गावसकर हे पण 1983च्या विश्वचषकाचे सदस्य होते, मात्र ते बीसीसीआयचे प्रभारी अध्यक्ष होते. यामुळे बिन्नी हेच एकमेव असे क्रिकेटपटू आहेत ज्यांनी विश्वचषक जिंकला असून बीसीसीआयचे पूर्णवेळ म्हणून रूजू झाले आहेत.
बीसीसीआयचे अध्यक्ष जे कसोटी सामने खेळले आहेत,
– महाराज कुमार विजयनगरम (1954-1956)
– शिवलाल यादव (2014)*
– सुनील गावसकर (2014)*
– सौरव गांगुली (2019-2022)
– रॉजर बिन्नी (2022-)
(* प्रभारी अध्यक्ष)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘जायंट किलर’ नामिबियाला पराभवाचा धक्का; शानदार विजयासह नेदरलँड्सचे मुख्य फेरीकडे पाऊल
ब्रेकिंग! रॉजर बिन्नी झाले बीसीसीआयचे अध्यक्ष, सौरव गांगुलीची घेतली जागा