रॉजर फेडररने काल विक्रमी १९व्या ग्रँडस्लॅम विजेतेपदाला गवसणी घातली आणि चाहते, टेनिस तज्ज्ञ व माजी खेळाडू यांनी लगेच त्याच्या या कारकिर्दीचा आढावा घ्यायला सुरुवात केली.
१८ वर्ष, ११ महिने आणि १० दिवसांपूर्वी सुरु झालेला हा प्रवास आता १९ ग्रँडस्लॅम विजेतेपदावर आला असून तो पुढेही सुरु राहणार असल्याचं काल फेडररच्या बोलण्यातून पदोपदी जाणवत होत.
२००१ मध्ये फेडररने पिट सॅम्प्रासचा विक्रमी सलग ३१ विम्बल्डन विजयांचा रथ रोखला आणि तेव्हा खऱ्या अर्थाने या टेनिसपटूबद्दल टेनिस जगताने प्रथम दखल घेतली त्यांनतर या खेळाडूने परत मागे वळून पहिलेच नाही. विशेष म्हणजे त्यांनतर पिट सम्प्रास केवळ २००२ साली अमेरिकन ओपनचे विजतेपद जिंकू शकला.
३५ वर्षीय फेडरर व्यावसायिक टेनिसकडे तसा १९९८ सालीच वळला होता तरी त्याला छाप पाडण्यासाठी तीन वर्ष वाट पाहावी लागली. १९९९ साली फेडरर प्रथमच ऑस्ट्रेलियन ओपनच्या रूपाने ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या पात्रता फेरीत खेळला. तर २००१ साली प्रथमच फ्रेंच ओपनच्या रूपाने पहिल्यांदा ग्रँडस्लॅम स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. त्याच वर्षी विम्बल्डनची उपांत्यपूर्व फेरी गाठताना चौथ्या फेरीत त्यावेळी दिग्गज टेनिसपटू असणाऱ्या पिट सम्प्रासला पराभूत केले.
फेडररला २००३ मध्ये विम्बल्डनच्या रूपाने पहिल्यांदा ग्रँडस्लॅम विजेतेपदाची चव चाखायला मिळाली आणि तेव्हा त्याचे वय होते २१ वर्ष १० महिने आणि २८ दिवस. काल जेव्हा फेडररने विक्रमी १९वे ग्रँडस्लॅम जिंकले तेव्हा त्याचे वय होते ३५ वर्ष ११ महिने आणि ८ दिवस आणि ग्रँडस्लॅम पण होते विम्बल्डनच.
पहिले विम्बल्डन ते आठवे विम्बल्डन या मधल्या १४ वर्ष आणि १० दिवसात फेडररने असंख्य विक्रम केले. आधीच्या दिग्गज खेळाडूबद्दल होणारी सर्व चर्चा थांबवून ती आपोआपच या खेळाडूबद्दल होऊ लागली. २०१२ मध्ये विम्बल्डन विजेतेपद जिंकल्यानंतर कारकिर्दीला थोडे ग्रहणसुद्धा लागले. या ५ वर्ष आणि ८ दिवसांच्या काळात २०१२ (अमेरिकन ओपन उपांत्यफेरी), २०१३ (ऑस्ट्रेलियन ओपन उपांत्यफेरी, फ्रेंच ओपन उपांत्यपूर्व फेरी), २०१४(ऑस्ट्रेलियन ओपन उपांत्यपूर्व फेरी, विम्बल्डन अंतिम फेरी, अमेरिकन ओपन उपांत्यफेरी), २०१५ (फ्रेंच ओपन उपांत्यपूर्व फेरी, विम्बल्डन अंतिम फेरी, अमेरिकन ओपन अंतिम फेरी), २०१६ (विम्बल्डन उपांत्यफेरी, अमेरिकन ओपन उपांत्यफेरी) आणि २०१६ (ऑस्ट्रेलियन ओपन विजेतेपद ) अशी कामगिरी केली. ही कामगिरी एखाद्या अन्य खेळाडूची कामगिरी म्हणून पाहिलं तर नक्कीच जबदस्त होती, परंतु फेडररची म्हटल्यावर ती त्याचे चाहते, टीकाकार, तज्ज्ञ, माजी खेळाडू यांच्या पचनी पडणारी नव्हती.
दोन ग्रँडस्लॅम स्पर्धात सलग ५ विजेतेपद जिंकणारा फेडरर हा एकमेव खेळाडू बनला. २००३ ते २००७ या काळात विम्बल्डन विजेतेपद आणि २००४ ते २००८ या काळात अमेरिकन ओपनचे विजेतेपद सलग ५ वर्ष फेडररने आपल्या नावावर केली आहेत. अशी कामगिरी फेडरर जेव्हा २७ वर्ष आणि १ महिन्यांचा होता तेव्हा केली.
फेडररने विम्बल्डन आणि ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद २००४ ते २००७ या काळात कोणत्याही अन्य खेळाडूला जिंकू दिले नाही. अशी कामगिरी फेडररने २६ वर्ष १ महिना आणि १ दिवसाचा असताना केली आहे.
एका वर्षात ३ ग्रँडस्लॅम विजेतेपद तीही ३ वर्ष अशी कामगिरी करणारा फेडरर केवळ पहिला आणि एकमेव खेळाडू आहे. अशी कामगिरी त्याने २००४, २००६, २००७ या वर्षी केली आहे. त्यात ऑस्ट्रेलियन ओपन. विम्बल्डन आणि अमेरिकन ओपन यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे त्यातील २००६ आणि २००७ साली त्याने फ्रेंच ओपनची अंतिम फेरी देखील खेळली आहे.
फेडरर २००७ साली जेव्हा अमेरिकन ओपनची अंतिम फेरी खेळला ती त्याची सलग १० वी ग्रँडस्लॅम अंतिम फेरी होती. २००८ साली उपांत्यफेरीत जोकोविचने फेडररचा पराभव करून ही श्रुंखला तोडली परंतु त्यांनतर पुन्हा पुढच्या ग्रँडस्लॅमपासून फेडररने पुन्हा सलग ८वेळा ग्रँडस्लॅम अंतिम फेरी गाठली.
२००९ साली फेडररने फ्रेंच ओपनच विजेतेपद जिंकून करिअर ग्रँडस्लॅम पूर्ण केलं. अशी कामगिरी करणारा तो केवळ ६वा पुरुष टेनिसपटू होता. फेडररपूर्वी फ्रेड पेरी, डॉन बज, रॉड लव्हर, रॉय इमर्सन आणि आंद्रे अगासीने अशी कामगिरी केली होती तर फेडररनंतर २०१० मध्ये नदालने अमेरिकन ओपन जिंकून तर जोकोविचने २०१६ फ्रेंच ओपन जिंकून करिअर ग्रँडस्लॅम पूर्ण केले. पुरुष एकेरीत अशी कामगिरी करणारे केवळ ८ खेळाडू आहेत.
फेडरर सलग २३ ग्रँडस्लॅम उपांत्यफेरीचे सामने खेळला असून हा विजयरथ २०१० फ्रेंच ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत रॉबिन सॉडर्लिंगने रोखला. त्यानंतर फेडरर केवळ एकदा सलग ४ ग्रँडस्लॅम उपांत्यफेरी खेळला आहे. दुसऱ्या स्थानावर असणारे इवान लेंडल सलग १० वेळा उपांत्यफेरी खेळले आहेत.
२००४ साली फेडरर प्रथमच एटीपी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आला. टेनिस जगतातील तो केवळ २४ वा खेळाडू होता ज्याने एटीपी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले. त्यानंतर तो सलग २३७ आठवडे या स्थानावर राहिला. हा सुद्धा एक विश्वविक्रम आहे.
२४ वर्ष, १० महिने आणि ३ दिवसांचा असताना फेडररने फ्रेंच ओपनची अंतिम फेरी गाठून सर्व ग्रँडस्लॅमची एकदातरी अंतिम फेरी गाठणारा खेळाडू बनण्याचा विक्रम केला. २००३ साली फेडररने विम्बलेडोंची अंतिम फेरी गाठून विजेतेपद जिंकले होते त्यानंतर त्याला सर्व ग्रँडस्लॅम अंतिम फेरी गाठायला २ वर्ष, ११ महिने आणि ५ दिवस लागले.