BCCI New Secretary :- भारतीय क्रिकेट नियामक मंडळात (बीसीसीआय) एक महत्त्वाचा बदल होण्याची शक्यता आहे. बीसीसीआयला नवे सचिव मिळू शकतात. विद्यमान सचिव जय शाह (Jay Shah) लवकरच आयसीसीचे नवे अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारू शकतात. त्यानंतर रोहन जेटली यांना ही जबाबदारी मिळू शकते. एका वृत्तानुसार, रोहन बीसीसीआयचे नवे सचिव होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. ते या शर्यतीत आघाडीवर आहेत. रोहन जेटली यांच्या नावावर सर्वांचे एकमत झाल्याने सांगण्यात येत आहे. अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि इतर अधिकारी मात्र त्यांच्या पदांवर कायम राहतील.
एका वृत्तानुसार, रोहन जेटली यांना बीसीसीआयचे सचिव बनवले जाऊ शकते. रोहन 2020 मध्ये प्रथम दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष झाले होते. यानंतर त्यांनी 2021 मध्ये विकास सिंग यांचा पराभव करून दुसऱ्यांदा विजय मिळवला. जय शाह आयसीसीचे अध्यक्ष बनल्यास त्यांना राजीनामा द्यावा लागेल. त्यामुळे रोहन यांना ही जबाबदारी मिळू शकते.
रोहन जेटली हे भारतीय जनता पक्षाचे माजी दिग्गज नेते अरुण जेटली यांचे पुत्र आहेत. त्यांनी देखील क्रिकेट प्रशासनात काम केले होते. त्यानंतर आता रोहनही त्याच मार्गावर आहे. रोहन यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली प्रीमियर लीगचे यशस्वी आयोजन करण्यात आले आहे. त्यात रिषभ पंत आणि इशांत शर्मासारखे मोठे खेळाडू खेळताना दिसतायेत.
बीसीसीआयचे सध्याचे सचिव जय शाह हे आयसीसीचे अध्यक्ष बनणे जवळपास निश्चित आहे. जवळपास सर्व आयसीसी सदस्य जय शाह यांच्या समर्थनात आहेत. आयसीसी बोर्डाच्या 16 पैकी 15 सदस्य जय शाहांच्या समर्थनात आहेत. जय शाह यांच्याआधी भारताच्या चार दिग्गजांनी आयसीसी प्रमुखपद भूषवले आहे. जगमोहन दालमिया, शरद पवार, एन श्रीनिवासन आणि शशांक मनोहर हे आयसीसीचे अध्यक्ष राहिले आहेत.
हेही वाचा –
टी20 विश्वचषकादरम्यान आर्थिक नुकसान झालं, ‘स्टार स्पोर्ट्स’नं आयसीसीकडे मागितली कोट्यवधी रुपयांची सवलत!
राहुल द्रविडच्या मुलाचा फ्लॉप शो जारी, बंगळुरूविरुद्ध संघाचा एकतर्फी पराभव
ठरलं! आयपीएल 2025 पूर्वी पंजाब किंग्ज या 5 खेळाडूंना रिटेन करणार, शिखर धवनचं भविष्य काय?