---Advertisement---

“मुंबईचा ‘सूर्य’ तळपला” राजस्थानविरुद्ध तुफानी खेळी केल्यानंतर कर्णधार रोहितकडून कौतुकाचा वर्षाव

On: बुधवार, ऑक्टोबर 7, 2020 12:51 PM
---Advertisement---

आयपीएलमध्ये काल झालेल्या 20 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सला 57 धावांनी पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने 193 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल राजस्थान संघ 136 धावांवर बाद झाला. या सामन्यात मुंबईचा फलंदाज सूर्यकुमार यादवने उत्कृष्ट फलंदाजी केली. त्याने 47 चेंडूत नाबाद 79 धावा करून मोठी धावसंख्या गाठण्यास संघाला मदत केली. तो मोठी खेळी खेळणार हे मला ठाऊक होते असे मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने सांगितले.

सूर्यकुमारने खेळले उत्तम फटके

सूर्यकुमारची प्रशंसा करताना रोहित म्हणाला, “मला माहित होतं की तो मोठी खेळी खेळणार आहे. सामन्याआधी मी त्याच्याशी बोललो होतो. शेवटच्या काही सामन्यात तो शानदार फलंदाजी करत होता. तुम्ही कसे फटके मारता यावर तुमचा डाव अवलंबून असतो. सूर्यकुमारने आज उत्तम फटके खेळले.”

प्रत्येक खेळाडूवर आहे विश्वास

मैदानातील परिस्थितीबद्दल बोलताना रोहित म्हणाला, “आम्ही आमच्या पूर्ण सामर्थ्याने खेळतो. आमच्याकडे एक मजबूत संघ आहे. आमचा प्रत्येक खेळाडूवर विश्वास आहे; कारण आम्हाला माहित आहे कोणत्याही क्षणी ते सामन्याचे चित्र बदलू शकतात. आमच्या वेगवान गोलंदाजांना परिस्थिती अतिशय उपयुक्त ठरली. चेंडू हवेत वळत होता आणि संघात असे गोलंदाज असणे आवश्यक आहे जे अशा परिस्थितींचा फायदा घेऊ शकतात. जेव्हा आम्ही यूएई येथे आलो तेव्हा परिस्थिती कशी असेल आणि वेगवान गोलंदाजांना मदत मिळेल की नाही याची आम्हाला कल्पना नव्हती.”

खेळाडूंनी केलेल्या क्षेत्ररक्षणाबद्दल झाला आनंद

क्षेत्ररक्षणाबद्दल बोलताना रोहित म्हणाला, “आमच्या खेळाडूंनी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केले याचा मला अभिमान आहे. येथे आल्यानंतर आम्ही क्षेत्ररक्षणावर खूप मेहनत घेतली आहे. खेळाडू अवघड झेल घेण्यात यशस्वी झाले याचा मला आनंद आहे.”

खेळाडूंना कामगिरीत करावी लागेल सुधारणा

राजस्थानची सुरुवात खराब झाली आणि तिसर्‍या षटकापर्यंत संघाने 12 धावात तीन गडी गमावले. संघाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथला वाटते की त्याचा संघ चांगली सुरुवात करण्यात सतत अपयशी ठरत आहे.

खेळाडूंच्या कामगिरीबद्दल बोलताना स्मिथ म्हणाला, “मला वाटते डावाच्या सुरुवातीलाच विकेट गमावल्यास काही फायदा होणार नाही. आम्ही मागील तीन सामन्यांमध्ये चांगली सुरुवात केली नाही. स्टार फलंदाज जॉस बटलर आणि वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर व्यतिरिक्त आमच्या इतर खेळाडूंना त्यांच्या कामगिरीत सुधारणा करावी लागेल.”

स्टोक्स आल्यानंतर मिळवू विजय

जागतिक क्रिकेटमधील अव्वल क्रमांकाचा अष्टपैलू बेन स्टोक्स लवकरच राजस्थान संघाकडून खेळताना दिसेल. सध्या तो क्वारंटाईनमध्ये आहे.

स्टोक्सबद्दल बोलताना स्मिथ म्हणाला,”स्टोक्स लवकरच संघात सामील होईल. मला आशा आहे की तो संघात आल्यानंतर आम्ही विजय मिळवू. आम्हाला आता भीती बाळगण्याची गरज नाही . आम्हाला फक्त आमच्या योजना अंमलात आणाव्या लागेल आणि चांगली कामगिरी करावी लागेल.”

मोठी खेळी खेळू शकतो याचा विश्वास होता

या सामन्यादरम्यान सामनावीर पुरस्कार मिळालेला सूर्यकुमार यादवच्या डोक्यावर वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने फेकलेला एक चेंडू आदळला होता. या बद्दल बोलताना सूर्यकुमार म्हणाला की, “आता बरे वाटत आहे. या सामन्यात मी मोठी खेळी खेळू शकतो याचा विश्वास मला होता. मागील सामन्यांमध्ये मी काही चुका केल्या होत्या. आज डावाच्या शेवटपर्यंत खेळण्याचा प्रयत्न केला.”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---