संयुक्त अरब अमिरातीमध्ये (युएई) आशिया चषकाची सुपर फोर फेरी खेळली जात आहे. सुपर फोरमधील दुसरा सामना परंपरागत प्रतिस्पर्धी भारत व पाकिस्तान यांच्या दरम्यान खेळला गेला. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकत भारतीय संघाला प्रथम फलंदाजांसाठी आमंत्रित केले. भारतीय संघाला कर्णधार रोहित शर्मा व केएल राहुल यांनी आक्रमक अर्धशतकी सुरुवात दिली. या अर्धशतकी सुरुवातीसह त्यांनी टी20 क्रिकेटमधील एक मोठा विक्रम आपल्या नावे केला.
प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर रोहित व राहुल यांनी पहिल्या दोन सामन्यांपेक्षा जलद सुरुवात भारतीय संघाला करून दिली. रोहितने पहिल्याच षटकात एक चौकार व एक षटकार वसूल केला. राहुलने देखील लवकरच हात खोलत षटकाराने सुरुवात केली. दोघांनीदेखील पहिल्या सहा षटकात पाकिस्तानच्या गोलंदाजांवर हल्ला चढवत भारताच्या धावसंख्येत वेगाने भर घातली. अवघ्या 5 षटकात त्यांनी भारताचे अर्धशतक फलकावर लावले. रोहित शर्मा बाद झाला तेव्हा भारताने 5.1 षटकात 54 धावा काढल्या होत्या.
या अर्धशतकी सलामीसह रोहित शर्मा व केएल राहुल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा 50 पेक्षा जास्त धावांची भागीदारी करणारी जोडी बनली आहे. ही त्यांची 14 वी 50 पेक्षा जास्त धावांची भागीदारी होती. त्यांनी आयर्लंडच्या पॉल स्टर्लिंग व केविन ओब्रायन यांच्या 13 वेळच्या भागीदारीचा विक्रम मोडीत काढला. न्यूझीलंडचे मार्टिन गप्टिल व केन विल्यम्सन, आयर्लंडचे पॉल स्टर्लिंग व ऍण्ड्रू बालबिर्नी तसेच स्कॉटलंडचे कायले कोएत्झर आणि जॉर्ज मन्सी यांनी प्रत्येकी 12 वेळा अर्धशतकी भागीदारी केली आहे.