गुरुवारी वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान, भारतीय कर्णधार रोहित शर्मा ११च्या वैयक्तिक स्कोअरवरदुखापतग्रस्त होऊन मैदानाबाहेर गेला. त्याच्या कंबरेला दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अपडेटनुसार, बीसीसीआयचे वैद्यकीय पथक त्याच्यावर लक्ष ठेवून आहे.
दुसऱ्या षटकात वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफचा सामना करत रोहितने पुढे खेळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याला थोडे अस्वस्थ वाटू लागले. या चेंडूवर, चेंडू बॅटच्या आतील काठावर आदळल्याने त्याला एक चौकार मिळाला आणि फाइन-लेग बाऊंडरीवर चार धावा गेल्या. फिजिओ कमलेश जैन यांच्याशी मैदानावर काही वेळ गप्पा मारल्यानंतर रोहितने मैदानाबाहेर जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, रोहित चौथ्या टी-२०मध्ये खेळेल अशी अपेक्षा आहे. शनिवारी लॉडरहिल, फ्लोरिडामध्ये हा सामना होणार आहे. मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामनाही रविवारी येथे होणार आहे.
सामन्यातील भारताच्या विजयानंतर रोहित म्हणाला की, “सध्या माझे शरीर ठीक आहे. पुढच्या सामन्यासाठी आमच्याकडे काही दिवस आहेत. तोपर्यंत मी बरा होईल अशी आशा आहे.” अष्टपैलू हर्षल पटेलच्या अनुपस्थितीमुळे भारतीय संघाला आधीच धक्का बसला होता. बरगडीच्या दुखापतीमुळे तो तिसऱ्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यातून बाहेर पडला. गुरुवारी, भारतीय संघाने पाठीच्या दुखापतीतून नुकताच सावरलेला अष्टपैलू रवींद्र जडेजा यालाही विश्रांती दिली. त्यांच्या जागी दीपक हुडा यांना संधी देण्यात आली.
दरम्यान, रोहितला यापूर्वी वेस्ट इंडिजमधील वनडे मालिकेतूनही विश्रांती देण्यात आली होती. यापूर्वी, इंग्लंड दौऱ्यावर तो पुन्हा नियोजित पाचव्या कसोटी सामन्यात खेळला नव्हता. लीसेस्टरशायरविरुद्धच्या चार दिवसीय सराव सामन्यादरम्यान त्याला कोरोना झाला होता. शिवाय अगदी महिन्याच्या आत आशिया चषक ही महत्वाची स्पर्धा सुरू होणार आहे. अशात भारताचा कर्णधार रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाल्यास भारतीय संघाला मोठा ढटका बसू शकतो. मात्र, अद्याप तरी रोहितला झालेली दुखापत सामान्य असल्याची माहिती समोर आल्याने भारतीय क्रिकेट चाहत्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारतीय फुटबॉलचा आधारस्तंभ – सुनील छेत्री
मागच्या दोन सामन्यात फेल ठरल्यामुळे रोहितला मोठा झटका, न्यूझीलंडच्या फलंदाजाने तोंडचा घास पळवला
भारतासाठी मध्यरात्री ‘सुर्या’ चमकला! अर्धशतक झळकावल्यानं संघात ‘या’ खेळाडूची जागा धोक्यात