– शंतनू जयंत आंबीलधोक
“When chips are down Ro stands up” हे शब्द होते महानतम यष्टीरक्षक फलंदाज ॲडम गिलख्रिस्ट याचे, रोहित शर्माने 2009 च्या आयपीएल मध्ये डेक्कन चार्जर्स ला फायनल पर्यंत पोचविण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्या नंतर एका पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये रोहितचे असे वर्णन गिलख्रिस्टने केले. खरं तर विराट कोहली नावाच्या सुर्यापुढे रोहित कायमच झाकोळला गेला पण त्याने देखील काही असे भीमपराक्रम केले ज्याची दखल फारशी घेतली गेली नाही आज आपण पाहूया त्याच भीमा पराक्रमांचा एक मागोवा:
1. तो सराव सामना:
3 जून 2009 रोजी टी-20 विश्वचषकात पाकिस्तान विरुद्ध सराव सामना रोहित शर्माने एकहाती गाजवला, खरंतर या सामन्याआधी सोहेल तन्वीरची भीती ही भारतीय संघामध्ये होती. आयपीएलमध्ये सोहेलने भारतीय फलंदाजांना चांगलाच घाम फोडला होता. मात्र रोहित शर्माने सोहेल व इतर पाकिस्तानी गोलंदाजांवर घनाघाती हल्ला चढवला. या खेळीचे महत्त्व यासाठी देखील जास्त आहे की सराव सामना असुन देखील तब्बल 50000 लोक अतिशय महाग टिकीट काढून हा सामना पहायला आले होते, तसेच या सामन्यानंतर विश्वचषकात पाकिस्तानी गोलंदाजांनी सर्वच देशांतील फलंदाजांसमोर त्यांचा ऊच्च दर्जा दर्शवला व हा विश्वचषक अगदी सहजच पटकावला
2. आंतरराष्ट्रीय पदार्पण:
रोहितचे आंतरराष्ट्रीय टी-20 पदार्पण हे 2007 टी-20 विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झाले, एखाद्या स्वप्नकथे प्रमाणेच हे पदार्पण होते. भारताची धावसंख्या फारशी नसताना रोहित फलंदाजीस उतरला; अवघ्या वीस वर्षाच्या रोहितने ताबडतोड फलंदाजी करत स्वतःचे अर्धशतक झळकावले व भारताला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. ज्या चेंडूवर त्याने अर्धशतक झळकावले तो चेंडू खरंतर बीमर होता तरीदेखील तो नोबॉल दिला गेला नाही या बिमरवर त्याने षटकार फटकावला. फलंदाजी झाल्यानंतर हाच रोहित उतरला क्षेत्ररक्षणासाठी, जस्टिन कॅम्पला त्याने केलेला रन आऊट भारताच्या इतिहासातील कदाचित सर्वोत्तम धावचित करण्याचा क्षण असावा; जवळजवळ चार ते पाच फूट हवेत उडत त्याने चेंडू प्रथम पकडला व त्यानंतर हवेतच हा चेंडू त्याने अशा पद्धतीने फेकला की चेंडूने थेट यष्टिंचा वेध घेतला. क्षेत्र रक्षणासाठीप्रसिद्ध असलेल्या दक्षिण आफ्रिकेसाठी तो एक जबरदस्त धक्का होता आणि त्या सामन्याचा तो टर्निंग पॉइट देखील ठरला
3. मुर्तजाची धुलाई:
बांगलादेश संघ किंवा बांगलादेशी गोलंदाज बघितले की रोहितला काही वेगळेच पुरण चढत असावं, आयसीसी’च्या जवळजवळ प्रत्येक चषकांमध्ये रोहितने बांगलादेशची यथेच्छ धुलाई केली आहे. 2009 च्या आयपीएलमध्ये मशरफ ए मुर्तजा गोलंदाजीला कोलकत्ता नाइट रायडर्सकडून शेवटचे षटक टाकायला आला. या षटकात डेक्कन चार्जर्सला एकवीस धावांची आवश्यकता होती. रोहितने या षटकात तब्बल 26 धावा फटकावल्या व डेक्कन चार्जर्सला हा सामना जिंकून दिला खरेतर दक्षिण आफ्रिकेतल्या वेगवान खेळपट्ट्यांवर एका द्रुतगती गोलंदाजांची अशी पिटाई करणे हे केवळ अद्भुत होते (2009 आयपीएल हे दक्षिण आफ्रिकेत खेळले गेले होते)
4. क्रिकेटमधील पुनर्जन्म:
खरेतर 2013च्या चॅम्पियन्स ट्रॉफी पर्यंत रोहितचे भारतीय संघातील स्थान हे कायमच डळमळीत राहिले होते. मधल्या क्रमांकांवर फलंदाजीला येत तो फारसे यश मिळू शकत नव्हता. परंतु एमएस धोनीला द्रुतगती गोलंदाजां विरुद्ध रोहितची सहजता माहीत होती. 2013 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वेळी धोनीने याच रोहितच्या खासियतेचा पूर्ण फायदा उठविण्याचा निर्णय घेतला व रोहितला सलामीला पाठवले. रोहितसाठी क्रिकेटमधील तो खऱ्या अर्थाने पुनर्जन्म होण्याचा क्षण होता. शिखर धवन व त्याची जोडी ही याच स्पर्धेदरम्यान जमली व याच्या पुढे अनेक ऐतिहासिक भागीदाऱ्या या दोघांनी रचल्या
5. इडन गार्डन्सवर प्रभुत्व:
भारतीय क्रिकेटची पंढरी इडन गार्डन्सवर व्हीव्हीएस लक्ष्मणने त्याच्या ऐतिहासिक खेळ्यांव्दारे एक विशेष मोहर उमटवली होती. रोहितने त्याचाच कित्ता गिरवून अनेक अजरामर खेळ्या ईडन गार्डन्सवर रचल्या, मग कसोटी पदार्पणात झळकावलेले दमदार 177 धावांची खेळी असो किंवा श्रीलंकेविरुद्ध वनडेत झळकावलेले महाकाय 264 धावा असोत; 2013 व 2015 सालचे आयपीएल चषक देखील याच मैदानावर रोहितने 80 हजारपेक्षा जास्त प्रेक्षकांच्या समोर पटकावले. आयपीएलमधील मुंबई इंडियन्सने कोलकात्यात ईडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्सना रोहितच्या खेळांच्याद्वारे नामोहरम करून सोडले
6. मुंबई इंडियन्स विरुद्धची हॅट्रिक:
ज्या मुंबई इंडियन्सला रोहितने यशाच्या शिखरावर पोहोचवले व या मुंबई इंडियन्सची ओळख तो बनला अशा मुंबई इंडियन्स विरुद्ध दक्षिण आफ्रिकेत 2009 साली झालेल्या आयपीएलमध्ये त्याने हॅट्ट्रिक नोंदवली होती. तत्कालीन घणाघाती फलंदाज जेपी डुमिनी व सौरभ तिवारी यांना देखील त्याने त्यादिवशी तंबूत परतवले होते. 2009 च्या डेक्कन चार्जर्सच्या यशात 22 वर्षीय तरुण रोहित त्याचा अमूल्य वाटा उचलतच होता
7. सुनील गावसकर यांनी दिला मराठी बाण्याचा धडा:
2008 च्या विबी त्रिकोणी शृंखलेत ज्यामध्ये श्रीलंका, ऑस्ट्रेलिया यांना भारताने परास्त केले त्यामध्ये रोहितचा दोन्ही फायनल सामने जिंकण्यात महत्त्वाचा अर्धशतकी वाटा होता. अलीकडे सचिन तेंडुलकरने त्याच्या युट्युब चॅनेलवर देखील त्या अर्धशतकांचा त्याच्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट भागीदाऱ्या यांमध्ये समावेश केला. या मालिकेमध्ये तीन अंतिम सामने होते. यातील पहिले दोन्ही सामने भारताने जिकून मालिकेवर कब्जा मिळवला. खरंतर या मालिकेआधी धोनीने अतिशय धाडसी निर्णय घेऊन एकाच फटक्यात सौरव गांगुली, राहुल द्रविड व लक्ष्मण यांना संघाबाहेर बसवून विराट कोहली, रोहित शर्मा व गौतम गंभीर यांची संघात निवड केली होती. त्याला देशातून मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता परंतु ही मालिका जिंकल्यानंतर धोनीचे नेतृत्व कौशल्य सगळ्यांनाच उमगले व शरद पवार यांनी धोनी व संघ यांची जंगी मिरवणूक दिल्लीमध्ये काढून त्यांचा तत्कालीन फिरोजशहा कोटला व आजचे स्वर्गीय पद्मविभूषण अरुण जेटली स्टेडियमवर भव्य सत्कार केला. पहिला अंतिम सामना संपल्यानंतर रोहितला सुनील गावस्कर यांनी मुलाखतीदरम्यान विचारले तू मराठी आहेस तर तू सचिनला पाजी असे का संबोधतोस तू त्याला मराठी संस्कृतीनुसार दादा म्हणायला हवे, ईएसपीएन स्टार स्पोर्ट्सवर ती मुलाखत थेट प्रक्षेपित होत होती, नवख्या रोहितला काय बोलावे सुचले नाही व त्याने ती वेळ हसून मारून नेली
8. सर्वात वेगवान शतक:
श्रीलंकेविरुद्ध इंदोरमध्ये 118 धावा रोहितने केवळ 48 चेंडूत फटकावल्या. याच खेळी दरम्यान त्याने शतक केवळ 35 चेंडूत झळकावला होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे सर्वात वेगवान t20 शतक आहे, याची बरोबरी नंतर डेव्हिड मिलरने देखील 35 चेंडूत शतक झळकावून केली. परंतु आज देखील रोहित भारताचा सर्वात वेगवान आंतरराष्ट्रीय शतक झळकवणारा खेळाडू आहे
9. पाकिस्तानी खेळाडूंकडून कौतुक:
पाकिस्तानी आजी-माजी खेळाडू त्रयस्थ माध्यमांवर सहसा भारतीय खेळाडूंचे कौतुक करत नाहीत. परंतु जहीर अब्बास यांनी रोहित खेळत असताना मी माझ्या दूरचित्रवाणी समोरून हलत नाही अशी अलीकडे प्रतिक्रिया दिली. जावेद मियाँदाद यांनी देखील रोहित भारताकडे आहे. यासाठी भारताने स्वतःला नशीबवान समजायला हवे अशी प्रतिक्रिया नोंदवली. तसेच हैदर अली या पाकिस्तानी नवख्या खेळाडूने त्याचा आदर्श रोहित शर्मा असल्याचे नमूद केले. पारंपारिक प्रतिस्पर्धी देशाकडून त्रयस्त माध्यमांवर भारतीय खेळाडूंचे असे कौतुक हे फक्त विराट कोहली, राहुल द्रविड व वीरेंद्र सेहवाग यांच्या नशिबात आले असावे.
10. देवासोबत तुलना:
याचवर्षी न्यूझीलंडचा गोलंदाज टीम साऊदीला सलग दोन षटकार फटकावले व सुपर ओवरमध्ये अशक्यप्राय विजय भारताला मिळवून दिल्यानंतर रोहित शर्मा हा हिटमॅन नसून देव असल्याची तुलना वीरेंद्र सेहवाग यांनी केली होती. सुपर ओवरमध्ये असा भीमपराक्रम आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये दुसऱ्या कोणत्याही फलंदाजाने आजवर केलेला नाही
वनडेत 3 द्विशतके, चार आयपीएल चषक, वनडेत सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या, आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार, दोन वेळा चॅंपियन्स लीगचा विजेता हे व असे अनेक विक्रम रचणाऱ्या रोहित शर्माला 33 व्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा