अहमदाबाद। गुरुवारी (१८ मार्च) भारत विरुद्ध इंग्लंड संघात चौथा टी२० सामना पार पडला. या सामन्यात भारताने ८ धावांनी विजय मिळवला. याबरोबरच ५ सामन्यांच्या टी२० मालिकेत भारताने २-२ अशी बरोबरी साधली आहे. भारताच्या या विजयात सुर्यकुमार यादवने अर्धशतकी खेळी करत मोलाचा वाटा उचलला. परंतु सॅम करनच्या चेंडूवर मोठा फटका मारत असताना डेव्हिड मलानच्या हाती तो वादग्रस्त पद्धतीने झेलबाद झाला. पण असे असले तरी सूर्यकुमारच्या खेळीते मोठ्या प्रमाणात कौतुक झाले. दरम्यान रोहित शर्माने सुर्यकुमारबद्दल १० वर्षांपूर्वी केलेले एक ट्विट व्हायरल होत आहेत.
दहा वर्षांपूर्वी रोहितने केले होते सुर्यकुमारचे कौतुक
रोहितने जवळपास १० वर्षांपूर्वी १० डिसेंबर २०११ रोजी सुर्यकुमारचे कौतुक करणारे एक ट्विट केले होते. त्यात त्याने लिहिले होते की ‘नुकताच चेन्नईमध्ये बीसीसीआय पुरस्कार सोहळा झाला. काही प्रतिभाशाली क्रिकेटपटू पुढे येत आहेत. भविष्यात सुर्यकुमार यादव नक्कीच लक्ष वेधून घेईल.’
रोहितचे हे ट्विट सध्या व्हायरल होत असून त्यावर चाहत्यांच्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
https://twitter.com/ImRo45/status/145534011199070210
सुर्यकुमारचे अर्धशतक
सुर्यकुमार त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हा दुसराच सामना खेळत होता. त्याने याच मालिकेतील दुसऱ्या टी२० सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. पण त्याला पदार्पणाच्या सामन्यात फलंदाजीची संधी मिळाली नव्हती. मात्र इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टी२० सामन्यात त्याला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी मिळाली.
त्यानेही ही संधी दोन्ही हातांनी पकडली. भारताच्या पहिल्या ३ विकेट्स लवकर गेल्यानंतरही त्याने आक्रमक फलंदाजी केली. विशेष म्हणजे त्याने त्याच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारला. त्याने या सामन्यात ३१ चेंडूत ५७ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ६ चौकार आणि ३ षटकार मारले.
पदार्पणाच्या टी२० डावात अर्धशतक करणारा पाचवा भारतीय
पहिल्या आंतरराष्ट्रीय टी२० डावात अर्धशतक ठोकणारा सूर्यकुमार हा पाचवा भारतीय फलंदाज असून त्याच्याआधी रोहित शर्मा, रॉबिन उथप्पा, अजिंक्य रहाणे आणि ईशान किशन यांनी असा कारनामा केला आहे. रॉबिन उथप्पा आणि रोहित शर्माने २००७ च्या टी२० विश्वचषकात पदार्पणाच्या डावात अर्धशतके केली होती. यानंतर २०११ मध्ये अजिंक्य रहाणेने पदार्पण केलेल्या टी२० सामन्यात ६१ धावांची खेळी केली होती. तर चालू असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या टी२० मालिकेच्या दुसर्या सामन्यात पदार्पण केलेल्या ईशान किशनने शानदार ५६ धावा फटकावल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या –
“तू खरंच मूर्ख आहेस…”, आपलीच खेळी पुन्हा मोबाईलवर पाहात असलेल्या सुर्यकुमारची पत्नीने उडवली खिल्ली
सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लाराची एमकमेकांना धक्काबुक्की, व्हिडिओ होतोय व्हायरल






