केपटाऊन। काल दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात पार पडलेल्या तिसऱ्या टी २० सामन्याआधी भारताचा नियमित कर्णधार विराट कोहली दुखापत ग्रस्त झाला. त्यामुळे उपकर्णधार असणाऱ्या रोहित शर्माने काल भारताचे नेतृत्व केले. या सामन्यात संघाचे कर्णधारपद भूषवताना रोहितने इतिहास रचला आहे.
या सामन्यात रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ७ धावांनी विजय मिळवून ३ सामन्यांची टी २० मालिकाही जिंकली. या विजयाबरोबरच रोहितने कर्णधार म्हणून सलग चौथा आंतराष्ट्रीय टी २० सामना जिंकला आहे.
असे करणारा तो पहिलाच भारतीय कर्णधार ठरला असून जगातील सहावा कर्णधार ठरला आहे. विशेष म्हणजे हा विक्रम करणारे सगळे आशियाई कर्णधार आहेत.
रोहितने या आधी डिसेंबर २०१७ मध्ये श्रीलंका विरुद्ध झालेल्या ३ सामन्यांच्या टी २० मालिकेत भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवले होते. त्यावेळी नियमित कर्णधार विराटला विश्रांती देण्यात आली होती. तसेच याच दरम्यान विराटने अभिनेत्री अनुष्का शर्मा बरोबर लग्न केले होते.
या श्रीलंका विरुद्धच्या टी २० मालिकेत भारताने ३-० ने विजय मिळवला होता. या मालिकेत रोहितने नेतृत्व करताना चांगली कामगिरी करताना मालिकेतील दुसऱ्या सामन्यात त्याच्या आंतराष्ट्रीय टी २० कारकिर्दीतील दुसरे शतक केले होते.
श्रीलंका विरुद्धच्या या टी २० मालिकेआधी वनडे मालिकाही पार पडली होती. या वनडे मालिकेतही रोहितच भारताचा प्रभारी कर्णधार होता. रोहितच्या नेतृत्वाखाली या वनडे मालिकेत भारताने २-१ ने विजय मिळवला होता.
कर्णधार म्हणून सलग चार आंतराष्ट्रीय टी २० सामने जिंकणारे खेळाडू:
कुमार संगकारा
लसिथ मलिंगा
मिस्बा उल हक
शाहिद आफ्रिदी
सर्फराज अहमद
रोहित शर्मा